![street-light](https://www.saamana.com/wp-content/uploads/2020/02/street-light-696x447.jpg)
सौरऊर्जा आणि सुक्या कचऱ्यातून पालिकेतर्फे करण्यात येणारी वीजनिर्मिती महापालिका इमारत प्रकल्पांना वापरली जात आहे. त्यातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची बचत होत आहे. मात्र, दुसरीकडे उड्डाणपूल, इमारती, उद्याने, विद्युत दिव्यांची खांबांवर रोषणाई करून विजेची उधळपट्टी केली जात आहे. पालिकेच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महापालिकेने सर्व इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल बसविले आहेत. त्यातून पहिल्या टप्प्यातील एकूण 72 इमारतींवर बसविलेल्या सौरऊर्जा पॅनेलमधून 1.47 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. त्यातून वर्षाला 20 लाख 10 हजार 960 युनिट मोफत उपलब्ध होत आहे. त्यामुळे महापालिकेची वर्षांला तब्बल सुमारे पावणेदोन कोटींची बचत होते. दुसऱ्या टप्प्यात नवीन 84 ठिकाणच्या इमारतींवर सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात येत आहेत. त्यातून एकूण 3 मेगावॅट वीज तयार होणार असून, महापालिकेची वर्षाला पावणेपाच कोटींची बचत होईल. नाशिक फाटा येथील उद्योजक जेआरती टाटा दुमजली उड्डाणपूल, भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, चिंचवड येथील मदर टरेसा उड्डाणपूल, निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल, ग्रेटसेपरेटर व वर्तुळाकार मार्ग, रावेत येथील संत तुकाराम महाराज पूल (बास्केट ब्रिज) आदी ठिकाणी रोषणाई केली आहे. पूर्णानगर येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यान हे केवळ रोषणाईसाठीच खुले केले जाते. पिपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील कारंजे व मोराची रोषणाईद्वारे सजावट केली आहे. संभाजीनगर येथील बर्ड व्हॅलीतील लेझर शोसाठी वीज वापरली जाते.
पालिका भवन व इतर इमारतीवर रंगीबेरंगी दिवे लावण्यात आले आहेत. सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्यांबर आवश्यकतेपेक्षा अधिक संख्येने प्रकाशदिव्यांचे खांब बसविण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी झाडांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मेट्रोने उभारलेल्या पिलरवर रोषणाई केली जाणार आहे. पालिका भवन, क्षेत्रीय कार्यालय, शाळा, विभागीय करसंकलन कार्यालय, गोदाम, रुग्णालय, दवाखाने आणि इतर कार्यालयात अधिकारी व कर्मचारी नसताना दिवे व पंखे सुरूच असतात. कर्मचारी नसताना आपोआप वीज बंद होणार असे धोरण आयुक्तांनी जाहीर केले होते. मात्र, ती यंत्रणा अनेक विभागांत कार्यान्वित करण्यात आलेली नाही.
शहराचे वैभव असणारे राजमाता जिजाऊ उद्यान, अटलबिहारी वाजपेयी उद्यान तसेच निगडी, नाशिक फाटा, भोसरी, मदर टेरेसा, बास्केट ब्रिज या उड्डाणपुलावर आकर्षक रोषणाई केली आहे.महापालिका भवनावर वेगवेगळ्या थीमवर रोषणाई केली जाते. त्यावर एलईडी लाईट आहेत, त्या रात्री केवळ दोन ते तीन तास सुरू असतात. त्यामुळे वीजखर्च अल्प होतो. त्याला विजेची नासाडी म्हणता येणार नाही. आकर्षक रोषणाईमुळे महापालिकेचे अनेक ठिकाणचे छायाचित्र व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांचे जगभरात कौतुकच झाले आहे. ती शहरासाठी अभिमानास्पद वाव आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जंभळे-पाटील यांनी सांगितले,
या ठिकाणी सौरऊर्जा पॅनेल
महापालिकेचे वायसीएमसह इतर सर्व रुग्णालये व दवाखाने आणि क्षेत्रीय कार्यालये, सेक्टर क्रमांक 23 मधील जलशुद्धीकरण केंद्र, महापालिका भवन, सर्व नाट्यगृह व सभागृह, समाजमंदिर, सर्व मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र, महापालिकेच्या सर्व शाळा, विभागीय करसंकलन कार्यालय, स्मशानभूमी, सुलभ शौचालय, तालीम, व्यायाम शाळा, कचरा संकलन केंद्र, ग्रंथालय, अग्निशमन केंद्र.
कचऱ्यातून 14 मेगावँट वीजनिर्मिती
महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात 700 टन सुक्या कचऱ्यातून दररोज 14 मेगावॅट बीज तयार केली जात आहे. वर्षाला 7 कोटी 20 लाख युनिट वीज महापालिकेस मिळते. ती बीज महापालिकेस 5 रुपये युनिट अशा अल्पदराने मिळते, ती वीज रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र, चिखली जलशुद्धीकरण केंद्र, कासारवाडी व चिखली मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र येथे वापरली जात आहे. त्यातून महापालिकेची वर्षाला 48 कोटी रुपयांची बचत होत आहे.