कॉपीमाफियांपासून जीव वाचवा! परभणीतील केंद्र संचालकांची विनवणी

कॉपीमुक्त परीक्षा मोहिमेला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे; परंतु या कॉपीमाफियांपासून आमचा जीव वाचवा, अशी आर्त विनवणी परभणी जिल्ह्यातील केंद्र संचालक विजय घोडके यांनी विभागीय शिक्षण मंडळाच्या बैठकीत केली. एवढेच नाही तर परीक्षा काळात पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

दहावी, बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वतीने आज सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमीत केंद्र संचालकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंडळाच्या विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार, प्रियाराणी पाटील आणि डी. एम. पानसरे यांची उपस्थिती होती. या बैठकीत परभणी जिल्ह्यातील विजय घोडके यांनी सर्वच केंद्र संचालकांच्या वतीने कॉपीमाफियांचा मुद्दा उपस्थित केला. मंडळाच्या कॉपीमुक्त मोहिमेला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे, परंतु गावागावात तयार झालेल्या कॉपीमाफियांपासून आम्हाला कोण संरक्षण देणार? असा सवालही त्यांनी केला. कॉपीला अटकाव करणाऱ्या केंद्र संचालकांना मारहाण करण्यापर्यंत कॉपीमाफियांची मजल गेली आहे. कॉपीमाफियांपासून आमचा जीव वाचवा, या घोडके यांच्या भूमिकेला अन्य केंद्र संचालकांनीही सहमती दाखवली.