खेळाडूंच्या ब्लेझरप्रकरणी ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंनी स्वतःच समिती नेमली

खेळाडूंना आखूड ब्लेझर शिवल्याच्या प्रकरणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आधिसभेत गठीत झालेली समिती डावलून कुलगुरूंनी स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय समिती नेमून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.

क्रीडा दिनानिमित्त आंतरविद्यापीठ स्पर्धेत कामगिरी केलेल्या व सहभागी विद्यापीठांच्या खेळाडूंचा गौरव 29 ऑगस्ट 2024 रोजी क्रीडा दिनानिमित्त ब्लेझर देऊन केला होता. हे ब्लेझर 82 खेळाडूंबरोबरच त्यांचे प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक आणि विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनाही दिले होते. परंतु हे ब्लेझरच आखूड शिवले होते. याबाबत अधिसभा सदस्य ए. बी. संगवे यांनी 24 सप्टेंबर रोजी झालेल्या अधिसभा बैठकीत प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेनंतर संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करायची, यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. या घटनेला तीन महिने झाले तरीही ही समिती गठीत केल्याचे किंवा समितीची बैठक असल्याचे पत्र संबंधितांना पाठविले गेले नव्हते.

या संदर्भात समितीचे सदस्य संगवे यांनी या समितीची कार्यवाही कुठपर्यंत आली आहे, असे कुलगुरू व कुलसचिव यांना 17 नोव्हेंबर 2024 रोजी लेखी कळविले होते. तसेच कुलगुरू प्रा. महानवर आणि कुलसचिव योगिनी घारे यांच्याकडे पाठपुरावा केला असता, कुलसचिव घारे यांनी अशी माहिती दिली की, समिती स्थापन केली आहे. त्यांनी बैठका घेतल्या आहेत. त्यांच्याकडून अहवाल सादर केला जाईल. त्यांना लवकरात लवकर अहवाल देण्याची विनंती केली आहे, असे उत्तर दिले होते. या संदर्भात अधिसभेत प्र. कुलगुरू प्रशासकीय समिती नेमली याबाबत कुलगुरू प्रा. महानवर यांना शनिवारी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, त्यांनी अशी माहिती दिली की, प्रश्नोत्तराच्या तासात झालेली समिती ही नियमाप्रमाणे गठीत होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही प्रशासकीय समिती नेमली आहे. त्यांच्याकडून माहिती घेतली असता, काही ब्लेझर आखूड झाले होते. काही अदलाबदली झाली होती. याची कार्यवाही संबंधित ठेकेदाराने केली आहे.

लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड व अधिसभा सदस्य ए. बी. संगवे यांची समिती नेमली होती. परंतु अधिसभेत ठरल्याप्रमाणे एकाही समिती सदस्याला या समितीच्या मीटिंग झाल्याचे माहिती नव्हते. प्रत्यक्षात समिती सदस्य असलेले व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सचिन गायकवाड यांनी समितीची मीटिंग झाल्याचे खंडन केले होते.

● अधिसभेत झालेला निर्णय बदलणे चुकीचे आहे. ब्लेझर मिळालेल्या सर्व 82 खेळाडू विद्यार्थ्यांना ब्लेझरबाबत काही तक्रारी असल्यास कळवावे, असे पत्र विद्यार्थ्यांना पाठवले नसल्याचे संबंधित प्रशासकीय समिती सदस्यांच्या निदर्शनास मी आणून दिले आहे. त्यामुळे सर्व 82 विद्यार्थ्यांना पत्र पाठवा, असे मी सांगितले आहे.
प्रा. सचिन गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य

● अधिसभेने घेतलेला निर्णय नियमाच्या चौकटीत बसत नसेल तर कुलगुरू महोदयांनी हे सभेतच सांगणे गरजेचे होते. नंतर स्वतःच्या अधिकारात प्रशासकीय समिती नेमण्यापेक्षा स्वतःच्या अधिकारात कुलगुरू हीच समिती कायम ठेवू शकले असते. परंतु प्रशासकीय समिती नेमून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का, अशी शंका वाटते. अधिसभेतला निर्णय बदलणे हा समिती सदस्याचा अपमान
नसून, अधिसभेचा अपमान आहे.

– ए. बी. संगवे, अधिसभा सदस्य.