कुंभमेळ्यात शेतकऱ्याचा ‘बैल वाचवा’चा नारा, गायींच्या 24 जाती नामशेष; नैसर्गिक शेतीसाठी लोकांना आवाहन

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात राजस्थानातील जयपूर येथील शेतकऱ्याने ‘बैल वाचवा’चा नारा देऊन सर्वांचे लक्ष वेधले. सर्वांनाच गायींची चिंता असते. मात्र कोणीच बैलांबद्दल भाष्य करत नाही, असे सांगताना रासायनिक शेतीमुळे उत्पादनात कमालीची घट झाली असून जमीन नापीक होत चालली आहे. तीन वर्षे शेती केल्यानंतर माझे 40 लाख रुपयांचे नुकसान झाले, असे राहुल शर्मा या शेतकऱ्याने सांगितले. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी प्रयागराज येथून एक मोहीम सुरू केली आहे, ज्याला ‘बैल वाचवा’ असे नाव देण्यात आले आहे.

महाकुंभच्या सेक्टर-8 मध्ये 50 वर्षीय राहुल शर्मा यांनी तंबू उभारला आहे. इथे येणाऱ्यांना ते बैल वाचवण्याचे आवाहन करतात. तसेच नैसर्गिक शेती आणि शेणखताचे फायदे सांगतात. बैलाचे महत्त्व, गरज, फायदे याबाबत ते लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत. बैल वाचल्यास हिंदुस्थानातील शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या शेतीसाठी रामबाण उपाय म्हणून काम करू शकतात, असा शर्मा यांचा मानस आहे.

बुल पॉवर’ क्लबची स्थापना

राहुल शर्मा म्हणाले की, वडिलांचा व्यवसाय बंद झाल्यानंतर पिठाची गिरणी सुरू केली. पण यात यश मिळाले नाही. त्यानंतर सततच्या अपयशामुळे डोक्यात आत्महत्येचा विचार आला. मात्र एका व्यक्तीने शेतीसाठी बैलांचा वापर करण्याचा सल्ला दिला आणि जीवनात क्रांतिकारी बदल झाले. ते पुढे म्हणाले, देशातील 64 गायींच्या जातींपैकी केवळ 40 जातींच्या गायी शिल्लक आहेत. याचे कारण म्हणजे गायीची चिंता करणारे लोक बैलांचा अजिबात विचार करत नाहीत. शेतीच्या दृष्टिकोनातून गोठय़ाची उपयुक्तता समजून घ्यायला हवी. 1 हजार गायींमध्ये किमान 200 वासरे असतात. मग त्यांचे संवर्धन का केले जात नाही? शेतीकामात बैलांची गरज लक्षात घेऊन मी जयपूरमध्ये ‘बुल पॉवर’ क्लब स्थापन केला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती आणि बैलाचे महत्त्व सांगितले जाते. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना याची माहिती देऊन ‘बैल वाचवा’ मोहिमेला दिशा दिली जाऊ शकते, असे मला वाटते.