ऑस्ट्रेलियात व्हाईटवॉश? शक्य नाही! सौरभ गांगुलीला विश्वास

मायदेशात न्यूझीलंडने हिंदुस्थानला व्हाईटवॉश दिला असला तरी ऑस्ट्रेलियात मात्र असे काही नक्कीच घडणार नाही, अशी आशा खुद्द हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केलीय. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ा चांगल्या असल्यामुळे ही प्रतिष्ठत मालिकाही रंगतदार होईल, असा विश्वासही त्याने बोलून दाखवला.

मीच नव्हे, तर अवघं क्रीडा विश्व बॉर्डर-गावसकर करंडक (बॉगाक) मालिकेची वाट पाहतेय. ही क्रिकेट विश्वातील अव्वल दोन कसोटी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेबाबत ऑस्ट्रेलियातही प्रचंड उत्साह आहे. या बॉगाक मालिकेनंतर विराट कोहली आणि रोहित पुन्हा ऑस्ट्रेलियात खेळायला येण्याची शक्यता नाही. त्यामुळे या मालिकेत खूप काही थरारक पाहायला मिळणार असल्याचेही गांगुलीने सांगितले.

कसोटी क्रिकेट हे तीन नव्हे, तर पाच दिवसांपर्यंत चालायला हवे. आपले जाडेजा आणि अश्विन तिसऱया दिवसांनंतर आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवतात. पहिले दोन दिवस फार काही घडत नाही आणि अचानक कसोटीत परिवर्तन पाहायला मिळते. ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ा चांगल्या आहेत की नाहीत याची प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आधीच खातरजमा करून घ्यायला हवी. मला आपल्या खेळाडूंच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. आपला एक चांगला संघ आहे आणि बॉगाक एक रोमहर्षक मालिका होणार असल्याचा विश्वासही गांगुलीने बोलून दाखवला.