![Saurabh Bhardwaj](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Saurabh-Bhardwaj-696x447.jpg)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या झालेल्या पराभवानंतर आप नेते सौरभ भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, छोट्या छोट्या लढाईत पराभूत झाल्यावरच मोठ्या युद्धात विजय मिळतो. त्यामुळे निराश किंवा हताश होण्याची गरज नाही. आप कार्यकर्त्यांनी हिंमतीने काम करावे आणि मोठ्या युद्धात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहवे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असून 10 वर्षे सत्तेत असलेल्या ‘आप’ला पराभव पत्करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचाही पराभव झाला आहे. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सौरभ भारद्वाज यांचाही पराभव झाला आहे. त्यांना भाजपच्या शिखा रॉय यांनी पराभूत केले आहे. या पराभवावर भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारद्वाज म्हणाले आहेत की, छोट्या छोट्या लढाईत पराभूत झाल्यावरच मोठ्या युद्धात विजय मिळतो. त्यामुळे निराश किंवा हताश होण्याची गरज नाही. आम आदमी पक्षाच्या सर्व समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानू इच्छितो, त्यांनी खाप परिश्रम घेतले आणि निवडणूक काळात खूप हिंमतीने काम केले. आता घाबरू नका आणि निराश होऊ नका. यापुढील विजय आपलाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सौरभ भारद्वाज हे सलग तीन वेळा ग्रेटर कैलासमधून आमदार राहिले आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये ग्रेटर कैलाश मतदारसंघात सौरभ भारद्वाज काही काळ आघाडीवर होते, परंतु नंतर भाजपच्या शिखा रॉय यांनी त्यांचा 3000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास मतदारसंघ दिल्ली विधानसभेतील प्रमुख मतदारसंघांपैकी एक आहे.