
सौदी अरबने हिंदुस्थान, पाकिस्तानसह एकूण 14 देशांतील नागरिकांवर व्हिसा बंदी घातली असताना आता हज यात्रेसाठी आलेल्या आणि गुपचूप सौदीत थांबलेल्या घुसखोरांना सौदी सरकारने अलर्ट दिला आहे. येत्या 29 एप्रिलपर्यंत देश सोडा अन्यथा मोठा दंड आकारला जाईल, असा इशारा दिला आहे. उमराहसाठी 13 एप्रिलपर्यंत सौदीत येण्याची परवानगी आहे. परंतु त्यानंतर 29 एप्रिलला कोणत्याही परिस्थितीत देश सोडावा लागेल, असे सौदीने म्हटले आहे. जर 29 एप्रिलनंतर सौदीत थांबल्यास त्यांच्यावर व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचा खटला दाखल होऊ शकतो, असे सौदीने म्हटले आहे. उल्लंघन करणाऱयांविरुद्ध 1 लाख सौदी रियाल म्हणजेच 22.94 लाख रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. हे पाऊल सौदी सरकारने हज यात्रेआधी उचलले आहे. हज यात्रेतील गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
18 हजार लोकांना अटक
सौदीत बेकायदेशीर राहणाऱयांविरुद्ध सौदी सरकारने कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. व्हिसा संपल्यानंतरसुद्धा अवैध मार्गाने सौदीत राहणाऱया 18 हजार 407 विदेशी नागरिकांना सीमा सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली आहे. दोषी आढळणाऱया विदेशी नागरिकांना 15 वर्षे तुरुंगवास किंवा जवळपास 2.30 कोटी रुपयांचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते. या वर्षी हज यात्रा 4 जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी सौदी सरकारने देशात बेकायदेशीर मार्गाने राहणाऱया विदेशी लोकांना देशाबाहेर काढण्यासाठी मोहिम राबवली जात आहे.