घराशेजारी राहणाऱ्या तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधासह नवऱ्याच्या जाचाला कंटाळून पत्नीनेच हॉटेल व्यवसायिक सतीश वाघ यांच्या खुनाची 5 लाखाची सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे. सतीश वाघ हे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते.
या प्रकरणात आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा, नवनाथ अर्जुन गुरसाळे, अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे यांना अटक करण्यात आली. आरोपी अक्षय हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू होता. त्यावेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याची कुणकुण सतीशला लागली होती. त्यामुळे मोहिनीने नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव रचला. तिने अक्षयला सतीशचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी 5 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. पतीकडून मानसिक त्रास आणि छळ होत असल्यामुळे मोहिनीने कटात सहभागी झाल्याची कबुली प्राथमिक तपासात दिली आहे.