‘खोक्या’चं पार्सल तुरुंगात; 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी, सतीश भोसलेचे वकील म्हणतात तो घटनास्थळी नव्हताच

भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता, कुख्यात गुंड तथा हरणतस्कर सतीश भोसले उर्फ खोक्याभाऊ याला न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरूरच्या तालुका कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतीश फोसले फरार झाला होता. त्याला उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथून अटक करण्यात आली होती. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्याभाऊच्या मुसक्या आवळव्या होत्या. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून बीड पोलीस त्याला महाराष्ट्रात घेऊन आले.

शुक्रवारी पहाटे त्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणण्यात आले आणि तिथून बीडमधील शिरूर कासार येथे नेण्यात आले. तिथे त्याची वैद्यकीय चाचणी करून दुपारच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

‘खोक्याभाई’ सतीश भोसलेचं घर जाळलं? परिवाराची काय चूक? अंजली दमानिया यांची पोस्ट

भोसलेचे वकील काय म्हणाले?

पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, असे सतीश भोसलेच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सरकारी वकिलांनी सदर आरोपी फरार आहे, बाकीचे आरोपींचा शोध सुरू असून त्यांनी वापरलेली गाडी व हत्यारं जप्त करायची असल्याने आरोपी ताब्यात पाहिजे असल्याचा युक्तीवाद केला. पण आमचे म्हणणे असे आहे की, आरोपीचे हत्यारं वगैरे जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. पण खोक्याचे घर वन विभागाने उद्ध्वस्त केले असून घरातील साहित्यही उचलून नेले. त्यामुळे नक्की काय जप्त करणार आहेत? हत्यार एकाच्या हातात दाखवले आहे आणि ते खोक्याकडून जप्त कसे करता येईल? असा सवालही वकिलांनी केला. तसेच खोक्यावर खोटा गुन्हा दाखल झाला असून सतिश भोसले त्या दिवशी घटनास्थळी नव्हताच. तो शिरूरमध्ये होता आणि त्याला फोन आल्यानंतर ढाकणे पिता-पुत्रा स्वत: दवाखान्यात दाखल केले होते, असा दावाही वकिलांनी केला.