Satish Bhosale – बीडमध्ये खोक्याभाऊच्या घरावर बुलडोझर, वनविभागाची कारवाई

भाजप आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाऊ ऊर्फ सतीश भोसले याला पोलिसांनी प्रयागराजमधून अटक केली आहे. यानंतर आता शिरूर कासार गावात असलेल्या त्याच्या घरावर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. वन विभागाच्या जागेवर खोक्याभाऊने अनधिकृतपणे घर होतं. याच घरावर आता वन विभागाकडून बुलडोझर फिरवला आहे. याआधी वनविभाने त्याला अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. मात्र 48 तासांमध्ये कोणतंही उत्तर न आल्यामुळे अकहर त्याच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला.

दरम्यान, शिरूर येथे एका जणास बेदम मारहाण करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःच खोक्याभाऊच्या विरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच खोक्याभाऊ गायब झाला होता. यानंतर तो थेट एका वाहिनीवर मुलाखत देण्यासाठी उगवला. या मुलाखतीत त्याने आपण कसे निर्दोष आहोत हे सांगितले. माध्यमांना खोक्याभाऊचा पत्ता सापडला, पण पोलिसांना तो सापडत नसल्याने चर्चा सुरू झाली. मात्र आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला पोलीस प्रयागराजमधून बीडमध्ये आणत आहेत.