चीनच्या कुरापती, पेंगाँग सरोवराजवळ केलं पक्कं बांधकाम; भूमिगत बंकरही बांधले, सॅटेलाईट फोटोंवरून उघड

विस्तरवादी भूमिकेने पछाडलेल्या चीनच्या सीमेवर कुरापती सुरुच आहेत. एकीकडे चर्चेची गुऱ्हाळं सुरू असताना दुसरीकडे लडाखमधील पेंगाँग सरोवराजवळ चीनच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनच्या सैन्याने येथे दीर्घकाळ शड्डू ठोकण्यासाठी पक्के बांधकाम केले असून भूमिगत बंकरही बनवले आहेत. सॅटेलाईट फोंटवरून हा चीनचा कावेबाजपणा उघडकीस आला आहे.

चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) पेंगाँग सरोवर आणि आजपासच्या भागामध्ये सातत्याने खोदकाम व पक्के बांधकाम करत आहे. शस्त्रास्त्र आणि इंधनाचा साठा करण्यासाठी चीनने येथे भूमिगत बंकरही बांधले आहेत. तसेच सैन्याची चिलखती वाहनं आणि इतर प्रमुख गोष्टींसाठी पक्के बांधकाम केले असून अमेरिकेच्या ‘ब्लॅकस्काय’ने सॅटेलाईटद्वारे घेतलेले फोटो जारी करत याचा भांडाफोड केला आहे.

मोदी ध्यानमग्न आणि सीमेवर चीनच्या कुरापती; सिक्कीमपासून अवघ्या 150 किमीवर लढाऊ विमाने तैनात

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पेंगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्यावरील सिरजाप येथे पीएलएचा लष्करी तळ आहे. सरोवराभोवती तैनात चिन्ही सैन्याचे हे मुख्यालय आहे. हिंदुस्थानने दावा केलेल्या भागातच हा लष्करी तळ उभारण्यात आला आहे. एलएसीपासून याचे अंतर 5 किलोमीटर आहे.

ब्लॅकस्कायने सॅटेलाईटद्वारे घेतलेल्या फोटोंनुसार 2021-22मध्ये चीनने भूमिगत बंकर उभारण्यास सुरुवात केली. शस्त्रास्त्र, इंधन आणि इतर लष्करी सामान ठेवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. याच वर्षी 30 मे रोजी घेतलेल्या फोटोंवरून बंकरला 8 प्रवेशद्वार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर त्याशेजारी असणाऱ्या थोड्या छोट्या बंकरला 5 प्रवेशद्वार असल्याचे दिसते. येथे चिलखती वाहनं, लष्करी वाहनं, इंधन आणि शस्त्रास्त्र साठवण्याची सोय करण्यात आली आहे.

यासह पक्के रस्ते आणि पक्के बांधकामही करण्यात आले आहे. हा तळ गलवान खोऱ्याच्या दक्षिण-पूर्वेस 120 किलोमीटर अंतरावर आहे. याच गलवान खोऱ्यात 2020मध्ये हिंदुस्खान-चीनचे सैन्य आमनेसामने आले होते. दोन्ही सैन्यात झालेल्या झटापटीत 20 हिंदुस्थान जवान शहीद झाले होते, तर चीनचे 40 जवान ठार झाले होते.