‘सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं’, या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या फलकाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काढलेला मार्मिक चिमटा चर्चेत असतानाच, आता काँगेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनीही ‘आता कशी वाजवली घंटी’, या फलकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऍक्शनला रिऍक्शन दिली आहे. एकंदरीत महायुतीच्या नेत्यांच्या घमेंडीला महाविकास आघाडीकडूनही फलकातून दिलेले हे मार्मिक प्रत्युत्तर आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीने कोल्हापूर आणि हातकणंगले ही जागा अत्यंत प्रतिष्ठsची बनवली होती. ही जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आठवडाभर कोल्हापुरात तळ ठोकून जोडण्या कराव्या लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर सभा घ्यावी लागली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही रात्रीचा मुक्काम ठोकून ‘साखर पेरणी’ करावी लागली. केंद्रातील आणि राज्यातील सत्तेचा पुरेपूर वापर केल्याचे दिसून आले. तरीसुद्धा महाविकास आघाडी महायुतीला पुरून उरली.
यापूर्वी कोल्हापूरसाठी संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी ‘आमचं ठरलंय’ म्हणून पुढाकार घेतला. त्याच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी मंडलिक यांच्या गद्दारीनंतर त्यांना पराभूत करण्यासाठी कोल्हापूरमधून महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तरीसुद्धा शाहू महाराजांच्या पराभवासाठी महायुतीकडून सर्व ते प्रयत्न करण्यात आले. प्रचाराची सांगता करताना मुख्यमंत्र्यांनी शहरातून रॅली काढली. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद पाहून अर्ध्यातच रॅली रद्द करावी लागली. पण जाता जाता मुख्यमंत्र्यांनी ‘आता कोणाची वाजवायची घंटी’, असा सवाल करत सतेज ऊर्फ बंटी पाटील यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पडसाद आता उमटल्याचे दिसून येत आहेत.
मतमोजणीपूर्वी संजय मंडलिक यांच्याकडून विजयाचे दावे करण्यात येत होते. त्यांच्या विजयाचे फलक कुठे लागले नाहीत. उलट मतदान होताच, मंडलिक हे मुश्रीफ यांच्यासह युरोप सहलीला निघून गेले. तर इकडे श्री शाहूंच्या विजयाच्या शंभर टक्के खात्रीने तसे विजयाचे फलक झळकले. प्रत्यक्ष मतमोजणीवेळी श्री शाहू महाराज छत्रपती हे दीड लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक मते त्यांना मिळाली. एकीकडे महाविकास आघाडीचा हा आनंदोत्सव सुरू असतानाच, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘सुजल्यावर कळतंय शरद पवारांनी मारलंय कुठं’, या आशयाचा लावलेला फलक सर्वत्र चर्चेचा विषय बनला. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष फोडून अजित पवार गट वेगळा झाला, त्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबतीत अजित पवार यांनी वेळोवेळी केलेल्या वक्तव्याचा समाचार तसेच शरद पवार यांच्यासमोर अजित पवार काहीच नसल्याचे येथील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिल्याचेही दिसून आले.
फलकातून मुख्यमंत्र्यांचा समाचार
उपमुख्यमंत्री पवार यांचा समाचार घेणाऱया फलकानंतर आता सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री शिंदे यांनाही मार्मिक टोला लगावण्यात आला आहे. येथील प्रचारात ‘आता कोणाची वाजवायची घंटी’, अशी विचारणा करत मुख्यमंत्री शिंदे यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता डिवचले होते. त्याची परतफेड सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. शहरात लावलेल्या ‘आता वाजवली घंटी’, या फलकाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.