महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी नाराज असल्याची चर्चा पसरवली जात आहे. पण सोशल इंजिनीअरिंग झाले पाहिजे आणि समाजातील सर्व घटकांना संधी मिळाली पाहिजे, अशी त्यांची भावना असल्याचे सांगत भाजप आणि महायुतीचा गनिमी कावा त्यांच्यावरच उलटेल, असा विश्वास काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभेला याची झलक दिसलीच आहे. आता विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनताच भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
सतेज पाटील म्हणाले, बदलापूरमध्ये झालेला अत्याचार, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भ्रष्टाचारामुळे झालेली दुर्घटना, सोयाबीनचा भाव, वाढलेली महागाई, महाराष्ट्राचे उद्योग दुसऱया राज्यात पळवून आपल्याकडे वाढलेली बेरोजगारी महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही. ही स्वाभिमानी जनताच आता गनिमी काव्याने भाजपचा नक्की कार्यक्रम करणार, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला. जिह्यात महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र जाऊन आमचा स्ट्राईक रेट मॅक्झिमम कसा असेल, हा आमचा प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 29) शक्तिप्रदर्शन करत आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापुरात काँग्रेस कार्यालयावर अज्ञातांची दगडफेक
शनिवारी (दि. 26) रात्री महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर यांच्या नावाची घोषणा झाली. यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास येथील स्टेशन रोडवर शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेने काही काळ खळबळ उडाली होती.