‘लाडकी बहीण’च्या थकीत अनुदानासाठी शिवसेनेची साताऱ्यात निदर्शने

राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेचे थकीत अनुदान लाडक्या बहिणींना त्वरित मिळावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

शिवसेना उपनेत्या छायाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी निदर्शने करत जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका (फलटण) कल्पना गिड्डे, शहर संघटिका लता तावरे, खटाव तालुका संघटिका सुमित्रा शेडगे, महिला आघाडीच्या रणरागिनी तसेच प्रणव सावंत, गणेश अहिवळे, सागर धोत्रे, सुमित नाईक, तानाजी चव्हाण आणि शिवसैनिक उपस्थित होते.

लाडक्या बहिणींना 2100 ऐवजी पंधराशे रुपये खात्यात टाकून सरकारने बहिणींची फसवणूक केली आहे. या योजनेतून दहा लाख महिला वगळण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांना फसवणारा आहे. या अर्थसंकल्पाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, अशी टीका शिवसेना उपनेत्या छाया शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

पुन्हा फसवणूक केल्यास ‘शिवसेना स्टाइल’ने आंदोलन

‘खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे असे करू नका’, निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ, असे आश्वासन देऊन लाडक्या बहिणींच्या जीवावर निवडून आलात आणि आता लबाडी का करता, असा सवाल निवेदनात केला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 2100 जमा नाही झाले. पुन्हा फसवणूक केली तर सातारा जिल्हा महिला आघाडीच्या वतीने ‘शिवसेना स्टाइल’ने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा छाया शिंदे यांनी यावेळी दिला.