महाराष्ट्राचे ‘मिनी कश्मीर’ म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर आता केवळ पर्यटनस्थळांसाठीच प्रसिद्ध नाही, तर इथली ताज्या फळांची विविधतादेखील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. विशेषतः महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीबरोबरच आता कासवंड आणि पुस्तकाचे गाव भिलार येथील रासबेरी आणि गुजबेरीचीही पर्यटकांना भुरळ पडत आहे. यामुळे महाबळेश्वरच्या कृषिक्षेत्रात मोलाची भर पडत आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार आणि कासवंड भागात रासबेरी आणि गुजबेरीची लागवड केली जात आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या फळांचे उत्पादन मिळविण्याची संधी मिळाली आहे. रासबेरी आणि गुजबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत नसल्यामुळे याचा बाजारभावही चांगला राहतो. रासबेरीचा दर सुमारे 1200 रुपये प्रतिकिलो असून, गुजबेरी 600 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.
महाबळेश्वरला ‘स्ट्रॉबेरी लॅण्ड’ म्हणून ओळखले जाते. येथील स्ट्रॉबेरी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. यंदा महाबळेश्वर तालुक्यात 2300 शेतकऱ्यांकडून 2800 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड केली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे आणि एकूणच महाबळेश्वरच्या कृषी व्यवसायात समृद्धी आली आहे.
जगात उत्तर अमेरिकेत रासबेरीची पिके आढळतात. त्यानंतर भारतातील महाराष्ट्रातून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी परिसरातून रासबेरीचे उत्पन्न घेतले जाते. विशेषतः भिलार, कासवंड परिसरातच ती उपलब्ध होते; अन्य कुठेही नाही. रासबेरीची रोपे डोंगरदऱ्यांत नैसर्गिकरीत्या येत असतात. शेतकरी डोंगरदऱ्यांतून रोपे शोधून आणून ती आपल्या शेतात लावतात. काटेरी असणारी या रासबेरीची शेती करणे फार अवघड आहे. मोठे कष्ट आणि मेहनत केल्यानंतर त्यातून मिळणारे उत्पादन हे आर्थिक जीवनमान उंचावणारे असल्याचे येथील शेतकरी संतोष दानवले सांगतात.
महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी, रासबेरी आणि गुजबेरी यांचा उत्पादन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. यामुळे त्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे आणि पर्यटकांना नव्या प्रकारच्या फळांची चव चाखण्याची संधी मिळत आहे, ज्यामुळे महाबळेश्वरच्या कृषी पर्यटनाला एक वेगळा गंध प्राप्त झाला आहे.
पर्यटनाला मिळाला नवा आयाम
महाबळेश्वरमध्ये फळांची विक्री केवळ कृषिक्षेत्रासाठी नाही, तर पर्यटनक्षेत्रासाठीसुद्धा फायदेशीर ठरली आहे. पर्यटक येथील ताज्या स्थानिक फळांची खरेदी करीत आहेत. त्यांना स्ट्रॉबेरीसह रासबेरी व गुजबेरीची चव चाखायला मिळत आहे. यामुळे महाबळेश्वरच्या कृषी पर्यटनाला एक नवा आयाम मिळाला आहे.
फळांचे वैशिष्ट्य आणि चव
रासबेरी हे गुलाब कुटुंबातील फळ आहे. याचे रंग लाल, काळे, पिवळे किंवा जांभळे असतात. याची चव तीव्र गोड-आंबट असते, ज्यामुळे पर्यटकांना ही फळे आकर्षित करतात. तर, गुजबेरी हे गोलाकार, पिवळ्या रंगाचे फळ आहे, ज्याची चव आंबट-गोड असते. या फळांची चव पर्यटकांना चांगलीच आवडत आहे.
शेतकऱ्यांचे योगदान
महाबळेश्वरमध्ये रासबेरी आणि गुजबेरीच्या उत्पादनात शेतकरी अनिल घामुणसे यांचा उल्लेख केला जातो, जे या फळांच्या यशस्वी पद्धतीने लागवडीवर लक्ष देत आहेत. त्यांच्या शेतात यशस्वीपणे या फळांचे उत्पादन घेतले जात आहे आणि इतर शेतकऱ्यांनादेखील याच पद्धतीने उत्पादन घेण्याची प्रेरणा मिळत आहे.