फेब्रुवारी- मार्च 2025 मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे 72 हजार 708 परीक्षार्थीना डिसेंबर महिन्यात शाळास्तरावर आणि फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षा केंद्रस्तरावर कॉपी न करण्याची शपथ दिली जाणार आहे.
परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थी कोणत्याही थराला जातात. परीक्षेत पेपर लिहिताना चोरून कॉपी केली जाते. कॉपीचे प्रकार होऊ नयेत, यासाठी बोर्ड परीक्षेवेळी खास फिरती पथके नेमली जातात, तरीही दरवर्षी कॉपीचे प्रकार उघडकीस येतात. याबाबत विद्यार्थ्यांतूनच उत्स्फूर्तता यावी, यासाठी विद्यार्थ्यांना ही शपथ दिली जाणार आहे. या उपक्रमांची माहिती शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यासह संबंधित सर्व घटकांना परीक्षेची माहिती दिली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात 771 माध्यमिक शाळा, तर 301 उच्च माध्यमिक शाळांतील एकूण 1072 विद्यालयांतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत. त्यात दहावीसाठी 38 हजार 345, तर इयत्ता बारावीसाठी 34 हजार 364 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.
कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर नुकतीच परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सर्व शाळाप्रमुखांची बैठक झाली. त्यात परीक्षेशी संबंधित सर्व मुद्द्यांची माहिती देण्यात आली. कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त परीक्षा आयोजनासाठी कडक कारवाईच्या सूचना आणि गुणात्मक सुधारणेसाठी परीक्षेशी संबंधित आवश्यक माहिती शाळाप्रमुखांना दिली.
विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधीच्या शिक्षा सूचीचे, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठामागील सूचनांचे वाचन तसेच मंडळाने सुचविलेल्या नमुन्यात ‘परीक्षेत गैरमार्ग करणार नाही,’ अशा आशयाची शपथ, प्रतिज्ञा शाळाप्रमुखांनी शाळास्तरावर देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कॉपीमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यासह परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात शाळास्तरावर प्रबोधन आवश्यक आहे. अन्यथा दुसऱ्या टप्प्यात कारवाई करणे अटळ आहे, असे कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
अशी आहे शपथ…
मी….या शाळेचा/महाविद्यालयाचा विद्यार्थी – विद्यार्थिनी असून, आज मी शपथ घेतो की, मी फेब्रुवारी-मार्च 2025च्या इयत्ता दहावी-बारावी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेसाठी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल, तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. सातत्याने अभ्यास करेन. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन. परीक्षेस मोठ्या आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणावविरहित सामोरे जाईन. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे / कनिष्ठ महाविद्यालयाचे, गुरुजनांचे, आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करेन.