गेल्या अनेक महिन्यांपासून हॉटेल मेघमधूरसमोर असलेल्या पालिकेच्या एका चेंबरमधून सांडपाणी थेट जंगलात जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावूनदेखील हा प्रकार बंद झालेला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाप्रमाणेच आता वन विभागानेही हा विषय गांभीर्याने घेतला असून, पालिकेचा कारभार आता वन विभागाच्या रडारवर आला आहे. वन विभागाकडून लवकरच पालिकेवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हॉटेल द्वारकाच्या परिसरात वीज वितरण विभाग कार्यालय व हॉटेल मेघमधूरसमोर पालिकेचे एक भुयारी गटार योजनेचे चेंबर आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चेंबरमधून सांडपाणी वाहत थेट जंगलात जात आहे. हे सांडपाणी जंगलातून मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानात जात आहे. या संदर्भात मुस्लिम समाजाच्या वतीने अनेक तक्रारी करण्यात आल्या. मात्र, या तक्रारींची पालिकेने दखल घेतली नाही. या सांडपाण्यामुळे या भागातील पर्यावरण धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे या भागातील सर्व कृत्रिम पाणवठे दूषित झाले आहेत. त्याचप्रमाणे या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, या भागात डासांचे प्रमाण वाढले आहे.
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष अधिकारी पाठवून पाहणी केली. यात सांडपाणी जंगलात सोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंडळाने पालिकेला नोटीस पाठवून सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची सक्त सूचना केली होती. नोटीस मिळून एक महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी पालिकेने या सांडपाण्याचा बंदोबस्त केलेला नाही.
दरम्यान, या गंभीर बाबीची दखल आता वन विभागाने घेतली आहे. वन विभागाचे वनपाल सहदेव भिसे व वनरक्षक अभिनंदन सावंत यांनी सांडपाणी ज्या चेंबरमधून जंगलात जात आहे, तेथील पाहणी केली. पाहणीनंतर वन विभागाने पालिकेला तोंडी सूचना केली आहे. या सूचनेनुसार पालिकेने जर सांडपाण्याचा बंदोबस्त केला नाही तर वन विभागाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. वन विभागाने या पूर्वीदेखील पालिकेवर व पालिकेच्या मुख्याधिकाऱयांवर याच कारणासाठी दंडात्मक कारवाई केली होती. वन विभाग यावेळीही पालिकेवर दंडात्मक कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.