जावळीतील अंधारीत तरुणाचा खून, हॉटेल जलसागरचा मालक कापसेला पुन्हा अटक

जावळी तालुक्यातील अंधारी येथे दि. 2 जानेवारीला संजय गणपत शेलार यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कण्हेर धरणाशेजारी असणाऱ्या हॉटेल जलसागरचा मालक अरुण बाजीराव कापसे (वय 55, रा. माळ्याचीवाडी, ता. सातारा) याला पुन्हा मिरजमधून ताब्यात घेतले. त्याला मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यास अटक करून न्यायालयात हजर केले असताना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, अंधारीत दि. 2 जानेवारीला संजय शेलार यांचा मृतदेह आढळला होता. शेलार हे आपल्या कुटुंबासह वाई तालुक्यातील एका गावात इमारत बांधकामावर कामाला होते. ते गावाला जातो, असे सांगून गावी आले होते. गावात आल्यावर त्यांना काही लोकांनी पाहिलेही होते. मात्र, दि. 2 जानेवारीला अचानक संजय यांचा मृतदेह गावच्या हद्दीतील एका शिवारात संशयास्पदरीत्या आढळला होता. शेलार यांचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आल्यानंतर पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. तपासात ठोस काही मिळत नसल्याने हा तपास नंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

याप्रकरणी दाखल असलेल्या फिर्यादीमध्ये अरुण कापसे याचे नाव होते. त्यामुळे दि. 15 जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कापसे याला अटक केली होती; परंतु न्यायालयात झालेल्या युक्तिवादामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अटकेचे ठोस कारण देता आले नाही. त्यामुळे न्यायालयाने कापसे याची मुक्तता केली होती. त्यानंतर एलसीबीने अधिक सखोल तपासाला सुरुवात केली. यामध्ये कापसे याच्या विरोधात काही पुरावे उपलब्ध झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांनी ते पुरावे सादर करून न्यायालयाकडून कापसे याच्या अटकेची परवानगी मिळवली. त्यानंतर एलसीबीने कापसेचा पुन्हा शोध सुरू केला. त्यामध्ये तो मिरज येथे असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार कापसेला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला मेढा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयात हजर केले असताना कापसेला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, जितेंद्र शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अमोल गवळी, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पांगारे यांच्यासह मेढा व वाई पोलीस ठाण्यांकडील पोलीस अंमलदार यांनी ही कारवाई केली.