सातारा हादरले! स्कूलबस चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक

शाळेत सोडणाऱ्या खासगी स्कूल बसचालकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने सातारा हादरले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नितीन राजाराम पवार (वय – 28, रा. पाटखळ माथा, ता. सातारा) व पुष्कर कांबळे (रा. सदरबझार, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

नितीन पवार याची खासगी स्कूल बस असून, तो दररोज बसने मुला-मुलींना शाळेत सोडतो. पीडित मुलगी अल्पवयीन आहे. त्याने मुलीशी ओळख वाढवली व संपर्क करू लागला. यानंतर त्याने ऑक्टोबर महिन्यात मित्र पुष्कर कांबळे याच्या सदरबझार येथील घरात पीडित मुलीला नेले. तेथे नितीन पवार याने या मुलीवर अत्याचार केले. तसेच, संशयिताने मुलीसोबत फोटो काढले. यामुळे पीडित मुलगी अधिकच घाबरली, त्यामुळे
तिने याबाबत कोणाला माहिती दिली नाही.

या सर्व घटनेनंतर पीडित मुलगी घरात अबोल आणि घाबरल्यासारखी राहू लागली. यामुळे आईला शंका आल्याने तिने मुलीला बोलते केले. यावेळी मुलीने घडलेल्या घटनेची माहिती दिली. मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, देशमुख, राहुल घाडगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले.

महिला पोलीस अधिकारी व महिला पोलिसांनी मुलीकडून सर्व माहिती घेतली व दोघांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली. दरम्यान, ही घटना समजताच पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. या घटनेने शहरात घबराट पसरली असून, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पालकांमधून चिंता व्यक्त होत आहे.

वाहनाच्या धडकेत महिला ठार

वडूथ-सातारा रस्त्यावर वाढे गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक महिला ठार झाली. तानूबाई रामचंद्र नलवडे (वय – 58, रा. वाढे, ता. सातारा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष रामचंद्र नलवडे (रा. वाढे, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. तानूबाई नलवडे या वाढे गावातून घराकडे पायी रस्ता ओलांडून जात होत्या. त्यावेळी वडूथ बाजूकडून साताराकडे जाणाऱ्या भरधाव वाहनाची तानूबाई नलवडे यांना जोरात धडक बसली.