कूपर कॉर्पोरेशनचा सिंफोनिया टेक्नॉलॉजीबरोबर करार; सीपीसीबीआयव्ही प्लस प्रमाणित एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करणार

हिंदुस्थानसह जपान आणि इतर आशियायी देशांत सीपीसीबीआयव्ही प्लस प्रमाणित एलपीजी जेनसेट्स उपलब्ध करून देण्यासाठी सातारा येथील कूपर कॉर्पोरेशन आणि जपानमधील सिंफोनिया टेक्नॉलॉजी ही बहुराष्ट्रीय कंपनी यांच्यात करार करण्यात आला आहे.

कूपर कॉर्पोरेशन या महाराष्ट्रातील आघाडीच्या आणि इंजिन, इंजिनचे सुटे भाग व जनरेटर उत्पादक कंपनीचा सिंफोनिया टेक्नोलॉजी या हरित वाहतूक उपकरणे, ऊर्जा नियंत्रण आणि एयरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसह भागीदारी करार होणे ही सातारच्या औद्योगिक जगतासाठी महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे.

या ऐतिहासिक भागीदारीमुळे शाश्वत ऊर्जा सुविधा तयार करण्याच्या प्रवासातील एक महत्त्काचा टप्पा नोंदवला गेला आहे. कारण कूपर कॉर्पोरेशनने सिंफोनिया टेक्नॉलॉजीसह भागीदारीत तयार केलेला देशातील अशा प्रकारचा पहिलाच 10 केक्हीए एलपीजी सीपीसीबीआयव्ही प्लस प्रमाणित जेनसेट उपलब्ध करण्यात आला आहे. सीपीसीबीआयव्ही प्लसने देशात घालून दिलेल्या कठोर उत्सर्जन निकषांचे पालन करत तयार केलेला हा जेनसेट शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने मोठी झेप घेणारा असून, त्यामुळे हरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात नवीन युगाची सुरुवात होईल.

कूपर सिंफोनिया जेनसेट मॉडेल नाव CSG-0010L-IN आणि त्याचे हिंदुस्थानातील ब्रँड नाव ‘DAIMON’ असेल. सिंफोनिया कंपनी जेथे आहे, त्या शहराचे हे नाव आहे. हेच उत्पादन जपानमध्ये कूपर कॉर्पोरेशन गेल्या 100 वर्षांपासून कार्यरत असलेल्या शहराच्या नावावरून, अर्थातच ‘सातारा’ नावाने उपलब्ध केले जाईल.

या जेनसेटमुळे ग्राहकांना विविध प्रकारचे लाभ, गुणवत्तापूर्ण कामगिरी, वाजवीपणा आणि विश्वासार्हता मिळेल. याचे उत्सर्जन मर्यादित असून, ते चालवण्यासाठी येणारा कमी खर्च व सोपी देखभाल यामुळे हे उत्पादन पारंपरिक डिझेल जेनसेट्स आणि ग्रीड पॉकरच्या तुलनेत दर्जेदार आणि किफायतशीर पर्याय ठरेल. इतर उर्जा स्त्रोतांच्य तुलनेत एलपीजी पर्यावरणावर कमीत कमी परिणाम आणि जास्त कार्यक्षमतेसह हरित आणि शाश्वत इंधन पर्याय म्हणून वेगळा ठरतो.