तासगाव रस्त्यावर कवलापूर बुधवारी सकाळी भरधाव प्रवासी जीपने दुचाकीला धडक दिल्यामुळे दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यू झाला. तर, हेल्मेट घातल्यामुळे वडील बचावले असून, ते गंभीर जखमी झाले आहेत.
दीपाली विश्वास म्हारगुडे (वय – 28), मुलगा सार्थक (वय – 7), राजकुमार (वय – 5, रा. आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. तर, दुचाकीस्वार वडील विश्वास दादासाहेब म्हारगुडे (वय – 30) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जीपचालक नितेश नाटेकर (रा. तासगाव) हा पसार झाला.
विश्वास म्हारगुडे हे मूळचे तळेवाडी (ता. आटपाडी) येथील असून, सांगलीत वास्तव्यास आहेत. आज सकाळी पत्नी दीपाली, मुले सार्थक, राजकुमार यांच्यासमवेत ते दुचाकीवरून तळेवाडी येथे लग्नासाठी जात होते. कवलापूर ते कुमठे फाटादरम्यान समोरून आलेल्या प्रवासी जीपने विश्वास यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकी मोडून पडली. या अपघातात दुचाकीवर समोरच्या बाजूला वडिलांसमोर बसलेला राजकुमार, तर पाठीमागे बसलेल्या दीपाली आणि मुलगा राजकुमार हे जागीच ठार झाले, तर वडील विश्वास गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर रस्त्यावरील वाहनचालकांनी जखमी विश्वास यांना तत्काळ सिव्हीलमध्ये दाखल केले. अपघातानंतर जीपचालक घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच, सांगली ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. दोन भावंडांसह आईचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून घटनास्थळी हळहळ व्यक्त होत होती.
हेल्मेटमुळे जीव वाचला
विश्वास म्हारगुडे यांनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे जोरदार धडकेनंतरही ते बचावले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. केवळ हेल्मेटमुळेच सुदैवाने त्यांचा जीव वाचल्याचे अपघातस्थळी दिसून आले.