
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढू लागल्याने भूजलपातळीत घट झाली आहे. तसेच पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतही आटू लागल्याने जिल्ह्यात टंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यातील 45 गावे व 298 वाड्या तहानलेल्या आहेत. 69 हजार 872 नागरिक व 42 हजार 747 जनावरांना 55 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एप्रिल महिन्यातच इतक्या टँकरने पाणी दिले जात असताना मे महिन्यात भीषणता आणखी वाढणार आहे.
सातारा जिल्ह्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाणीटंचाईच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची मागणी वाढली असल्याने टंचाईग्रस्त भागात प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. मे महिन्यात उन्हाची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरची मागणी वाढल्यास प्रशासनाला पाण्यासाठी आणखी जादा टैंकर पुरवावे लागणार आहेत.
माण तालुक्यातील बिजवडी, पांगरी, येळेवाडी, पाचवड, राजवडी, जाधववाडी, वडगाव, मोगराळे, मोही, डंगीरेवाडी, थदाळे, वावरहिरे, अनभुलेवाडी, दानवलेवाडी, हस्तनपूर, सोकासन, धुळदेव, बरकुटे म्हसवड, कारखेल, हवालदारवाडी, भाटकी, संभुखेड, खडकी, रांजणी, जाशी, पळशी, मार्डी, खुटबाव, पर्यंती, इंजबाव, भालवडी, पानवण, विरळी, वारूगड, कुळकजाई, टाकेवाडी, उकिर्डे, कोळेवाडी, परकंदी, आंधळी, महिमानगड, दोरगेवाडी यांसह 24 गावे व 291 वाड्यांना 47 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
पाटण तालुक्यातील जाधववाडी, जंगलवाडी, शिदुकवाडी (बरची, खळे) शिदू कवाडी (काढणे), भोसगाव (आंबुळकरवाडी), चव्हाणवाडी नाणेगाव असे 1 गाव, 4 वाड्यांना 4 टँकरने पाणी दिले जात आहे. वाई तालुक्यातील मांढरदेव अंतर्गत गडगेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, अनपटवाडी अशा 1 गाव 3 वाड्यांना 3 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यातील भंडारमाचीलाही टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करा – विखे
ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करावे, टँकर सुरू असलेल्या गावात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. तालुकापातळीवर पाणीपुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जि. प. सीईओ आशीष येरेकर, मनपा आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते.
विखे म्हणाले, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी पाण्याच्या उद्भवात उपलब्ध पाणीसाठ्याची स्वतः खात्री करावी. पाण्याचा उद्भव गावापासून कमी अंतरावर राहील, याची दक्षता घ्यावी. पाण्याचे नमुने तपासल्याशिवाय टँकर भरू नयेत, अशा सूचना त्यांनी दिल्या