साताऱ्यातील 120 जणांचे शस्त्र परवाने रद्द होणार, पोलिसांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

आपल्या जीविताला धोका असल्याचा कांगावा करून शस्त्र परवाने मिळवलेले आणि त्या शस्त्रांचा दुरुपयोग करणारे पोलीस दलाच्या रडारवर आले आहेत. सातारा जिल्ह्यातील अशा एकूण 120 शस्त्र परवानाधारकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीस दलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे या परवानाधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सातारा जिल्ह्यातील शस्त्र परवानासंदर्भात पोलीस दलाने नुकताच आढावा घेतला. या आढाव्यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या अभिलेखांवरील काही शस्त्र परवानाधारकांवर गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, काही परवानाधारकांकडून शस्त्रांचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा व्यक्तींकडून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कार्यवाही केली जात असल्याचे पोलीस दलाने म्हटले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले, शस्त्रांचा गैरवापर करणारे, सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याची शक्यता असलेले तसेच गुन्हे दाखल असलेले अशा एकूण 120 शस्त्र परवानाधारकांचे शस्त्र परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था अधिक मजबुतीने राखणे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत करणे हा मुख्य उद्देश आहे. लवकरच या शस्त्र परवान्यांच्या रद्दबाबतची आवश्यक पूर्तता पूर्ण होईल असे जिल्हा पोलिसांच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. या कार्यवाहीमुळे जीवाला धोका असल्याचा कांगावा करून शस्त्र परवाने मिळवलेल्या लोकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.