‘सात’ साजरी करत शहापुरात शेतकऱ्यांची लावणी; शेतात सर्पदंश, विंचूदंश होऊ नये, कुणी आजारी पडू नये यासाठी पिढ्यांची प्रथा

गेल्या पाच दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकरी सुखावला असून त्याला आता भाताच्या लावणीचे वेध लागले आहेत. शेतात भरघोस पीक यावे, कुणालाही सर्प, विंचू दंश होऊ नये आणि कुणीही आजारी पडू नये यासाठी शेतातील देवाला नैवेद्य दाखवण्याची ‘सात’ महोत्सवाची परंपरा आजही शेतकऱ्यांनी जपली असून शेतकऱ्यांनी वर्गणी काढून शेतावर जात हा उत्सव साजरा केला. शेतातील देवाला नैवेद्य दाखवून शहापुरातील शेतकऱ्यांनी लावणीची रोपे शेतात रोवली.

ग्रामीण भागात अनेक चालीरिती आजही जपल्या आहेत. त्यापैकीच शेतात लावणी करण्याआधी गावकऱ्यांनी एकत्र येत ‘सात’ महोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. पूर्वी ग्रामदेवतेसमोर बोकड, कोंबड्यांचा बळी देऊन त्याचे समान वाटे गावात वाटले जात, परंतु आता संकरित बियाणे, कीटकनाशके, ट्रॅक्टरसारखी आधुनिक यंत्रणा वापरत तांत्रिक शेतीकडे वळलेल्या बळीराजाने काळाची गरज ओळखून आता बळीची अघोरी प्रथा बंद केली आहे. त्याऐवजी मलिदा प्रथा सुरू करण्यात आली आहे. या प्रथेमुळे शेतात काम करण्यापूर्वी शेतकरी मानसिकदृष्ट्या निश्चिंत होतो आणि आमच्या पूर्वजांची ही प्रथा आम्ही आजही पाळतो अशी प्रतिक्रिया बाळू वीर या शेतकऱ्याने दिली.

मलिदा म्हणजे काय?

शेतात ग्रामदेवतेसमोर तांदळाच्या भाकऱ्या आणि गुळाचा नैवेद्य ठेवण्यात येतो. या भाकरीचे तुकडे करून त्यात गूळ मिसळून त्याचा प्रसाद वाटतात, त्याला मलिदा असे म्हणतात. त्याचबरोबर नारळ फोडून किंवा नारळाच्या सुक्या वाट्या मोडून नंतरच लावणी केली जाते अशी माहिती शेतकरी संतोष कामडी यांनी दिली.

बेलवड, अजनुप, दहीगाव, जरंडी, दळखण, विहीगाव, वेळूक, वाशाळा, सावरोली, बेलकडी, गांगणवाडी या परिसरात प्रामुख्याने शेतकरी ‘सात’ नावाची पूजा करतात. रविवारी सामूहिकरित्या शेतात उतरत ही पूजा करण्यात आली, तर काही गावात येत्या बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी ‘सात’ पूजा करून बळीराजा लावणी करेल असे सांगण्यात आले.