
अलिबाग तालुक्यातील सासवणे गावात काही टवाळखोरांनी हैदोस घातला आहे. गावातील महिला व्यायामशाळेच्या इमारतीवर क्रिकेटचे साहित्य ठेवण्यासाठी बेकायदा करण्यात येणारे बांधकाम महिलांनी बंद पडले. याचा राग धरून या टवाळखोरांनी अश्लील मजकूर असलेल्या चिठ्या महिलांच्या घरी पाठवल्या आहेत. तसेच महिलांना बदनाम करण्यासाठी काही चिठ्या व्यायामशाळेतही टाकल्या आहेत. या खोडसाळपणामुळे गावातील ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी या टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सासवणे येथील संतश्रेष्ठ पेडणेकर महाराज मठ परिसरात शासकीय जागेत महिला व्यायामशाळा बांधण्यात आली आहे. या व्यायामशाळेलगत तलाव व झाडे होती. येथील जागेतील झाडे तोडून व तलाव बुंजवून बेकायदा क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले आहे. मात्र याबाबीकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. येथे कोळीवाड्यातील तरुण क्रिकेट खेळायला येतात. काही दिवसांपूर्वी व्यायामशाळेच्या इमारतीवर क्रिकेटचे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी रूम बांधण्याचा प्रयत्न तरुणांनी केला. या बांधकामाला महिलांनी विरोध केल्यानंतर या टवाळखोरांनी महिलाना त्रास देण्यासाठी व्यायामशाळेच्या खिडकीतून व्यायामशाळेच्या आत अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठया टाकल्या. तसेच काही महिलांच्या घरीही या चिठ्ठया पाठवल्या. महिलांना बदनाम करण्यासाठी काही चिठ्ठया परिसरातही फेकल्या. याबाबत महिलांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टवाळखोरांवर कारवाई करण्यासाठी महिलांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्याच्या गृह विभागाकडे निवेदन दिले आहे.
सुरक्षेला प्राधान्य द्या !
व्यायाम शाळेच्या वर होणाऱ्या बेकायदा बांधकामाला विरोध केल्याने टवाळखोरांनी महिलांना धमकावणे, त्यांच्या नावाने अश्लील चिठ्या टाकणे असे प्रकार सुरू केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या महिलांसाठी लाडकी बहीण योजना तसेच महिलांसाठी इतर योजना राबवत असताना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्नेहल देवळेकर, निवेदिता गावंड यांनी केली आहे. दरम्यान या टवाळखोरांचा गॉडफादर कोण आहे, याचाही पोलिसांनी शोध घेऊन त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी निशिकांत घरत यांनीही केली आहे.