
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांसाठी उपचार नाकारल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची आता ससून रुग्णालयातील समिती चौकशी करणार आहे. या प्रकरणात डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाला आहे का? गर्भवती महिलेला देण्यात आलेले उपचार योग्य होते का? याचा तपास ससूनच्या चौकशी समितीकडून केला जाणार आहे. तनिषा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या उपचारांची चौकशी या समितीकडून केली जाणार आहे.
ससून रुग्णालयाच्या चौकशी समितीची प्राथमिक बैठक झाली असून, मंगळवारपासून या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात होणार आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी दीनानाथ मंगेशकर रूग्णालय, सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल या रुग्णालयांमध्ये नेमके काय घडले याचा चौकशी अहवाल ससून प्रशासनाला दिला होता. त्यानुसार ससूनच्या चौकशी समितीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी राज्य आरोग्य विभागाची चौकशी समिती, धर्मादय आयुक्त समिती आणि महापालिका आरोग्य विभागाच्या माता मृत्यू अन्वेषण समितीने या प्रकरणाची चौकशी केली असून, या तिन्ही समित्यांकडून चौकशी अहवाल सरकारला सादर करण्यात आले आहेत.