
युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ व गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीगच्या तिसऱ्या पर्वात ‘सर्वेश इलेव्हन’ने गिरगावचा राजाचा पराभव करत जेतेपद पटकावले. इस्लाम जिमखान्यावर झालेल्या या स्पर्धेचा थरार गिरगावकर व क्रिकेटरसिकांनी याचि देही याचि डोळा अनुभवला. या स्पर्धेचे उद्घाटन युवासेना कार्यकारिणी विरुद्ध डिजिटल मीडिया यांच्यातील प्रेक्षणीय लढतीने झाला. युवासेना संघाचे नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी केले होते व तुफान फटकेबाजी करत सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकले व सामना एकहाती जिंकला.
या स्पर्धेला शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत, विधान परिषद विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे, शिवसेना सचिव व आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते व आमदार अनिल परब, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अशोक धात्रक, आमदार सुनील शिंदे, युवासेना सचिव व आमदार वरुण सरदेसाई, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, संतोष शिंदे, विधानसभा संघटक युगंधरा साळेकर व सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
या थरारक लीगमध्ये 16 संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता. अंतिम फेरीमध्ये गिरगावचा राजा विरुद्ध सर्वेश इलेव्हन या दोन बलाढ्य संघांमध्ये झालेल्या लढतीत सर्वेश इलेव्हनने बाजी मारली. या लीगमध्ये उदयोन्मुख खेळाडू हर्ष पटेल, उत्कृष्ट फलंदाज प्रथम परमार, उत्कृष्ट गोलंदाज अनिकेत मळेकर, मालिकावीर साईराज माने, उत्कृष्ट झेल आयुष मळेकर, उत्कृष्ट यष्टिरक्षक भूषण नलगे यांना सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मुंबई रणजी संघाचे निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील, कुलाबा विधानसभा प्रमुख पल्लवी सकपाळ, मुंबई क्रिकेट असोसिएशन अॅपेक्स सदस्य मंगेश साटम, सुरेश साळुंखे, कुलाबा विधानसभा संघटक गणेश सानप, उपविभाग प्रमुख कृष्णा पोवळे, विधानसभा समन्वयक उदय बने, सुनील देसाई, समन्वयक दिलीप सावंत, विनोद लोटलीकर, निलेश देवळेकर, अभिजित गुरव हौशीबाल मंडळाचे सचिव राजा सावंत उपस्थित होते.