पवनचक्कीच्या वादातून बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचे वादळ अजून घोंगावत असतानाच धाराशीवमध्ये मेसाई जवळगाच्या सरपंचावर याच वादातून जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सरपंच आणि त्यांचा भाऊ जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम हे बारूळवरून गावाकडे येत असताना दुचाकीस्वारांनी त्यांच्या गाडीवर पेट्रोल भरलेले फुगे फेकले, मात्र प्रसंगावधान राखून निकम यांनी गाडी पुढे काढली. पण दुचाकीस्वारांनी समोरील काचेवर अंडी फेकली. त्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. याचाच फायदा घेत त्या दुचाकीस्वारांनी गाडीची काच फोडून आत पेट्रोलचे पलिते फेकले, परंतु निकम यांनी गाडी भरधाव पुढे काढली आणि पलिते बाहेर फेकले. यात नामदेव निकम आणि त्यांचा भाऊ जखमी झाले. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाला असे नामदेव निकम यांनी म्हटले आहे.
कठोर कारवाई करणार
सरपंच नामदेव निकम यांच्यावर रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तुळजापूर पोलिसात मनुष्यवधाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई करून योग्य तपास केला जाईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिले आहे.