स्वराज्याची सागरी राजधानी शिवलंका म्हणजेच मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ल्याचा सखासोबती सर्जेकोटची मागील 50 वर्षांत केवळ तटबंदी उरली आहे. बुरुजावर बेसुमार झाडी वाढली असून खंदकांचा कोणताही मागमूस राहिलेला नाही. या ऐतिहासिक वास्तूची पडझड रोखण्यात पुरातत्व विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. हा शिवकालीन ठेवा जतन आणि रक्षण करताना शिवभक्त, भूमिपुत्रांच्या दृष्टीने पुनर्बांधणी करून विकास करावा, अशी मागणी कोळंब, सर्जेकोट रहिवाशांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मालवण शहराच्या उत्तरेस 2 किमी अंतरावर हा किनारी कोट आहे. मालवण-मसुरे मार्गावर कोळंब खाडी पूल ओलांडले की रुंडी गावात भर वस्तीच्या एका बाजूस या सर्जेकोट किल्ल्याचे उरलेसुरले अवशेष पाहायला मिळत आहेत. या किल्ल्याच्या पश्चिम बाजूने समुद्र व उर्वरित तिन्ही बाजूंनी खंदक तर दुहेरी तटबंदीचे संरक्षणही होते. या स्थळी खंदकाच्या आठवणी बाकी असून आतील, किनारी तट, बुरुजाना प्रशस्त झाडांच्या पाळामुळांनी वेढा घातल्याचे दिसून येत आहे.
देशाच्या पर्यटन नकाशावर असलेले मालवण देशी-विदेशी पर्यटकांना नेहमीच भुरळ घालते. मालवणात आलेले पर्यटक, दुर्गप्रेमी सिंधुदुर्गसह राजकोट, सर्जेकोट, पद्मदुर्ग किल्ल्यांना आवर्जून भेटी देतात. सर्जेकोटसारख्या पुरातन वास्तूच्या पडझडीकडे मात्र इतिहासकार, पुरातत्व विभागाचे अधिकारी, सरकारला फिरकण्यास अद्याप वेळ मिळालेला नाही. यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपविभागप्रमुख प्रमोद धुरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊा या शिवकालीन किल्ल्याचा केंद्र व राज्य सरकारच्यावतीने पुनर्विकास करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने पर्यटन विकास करण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे.
निवेदनाच्या प्रती खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय पाटील, आमदार वैभव नाईक, विधानसभेचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे, माजी खासदार विनायक राऊत यांना सादर करण्यात आल्या आहेत.
भूमिपुत्रांना रोजगार मिळेल
पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विकास महामंडळ किंवा राज्य सरकारी संस्था जीर्णोद्धार समितीच्यावतीने कोळंब खाडी, सर्जेकोट, कोळंब गाव, भरड, तोंडवली, समुद्र किनाऱ्यावरील भद्रकाली मंदिर, मारुती मंदिर परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीने पर्यटन क्षेत्र उभारावे. यामुळे भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक न्याय मिळेल, असेही धुरी यांनी निवेदनात म्हटले आहे.
युनेस्कोच्या यादीत सर्जेकोटला स्थान?
लवकरच पॅरिसवरून युनोस्कोचे जागतिक प्रतिनिधी 12 गडकोट, किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. यामध्ये सर्जेकोट किल्ल्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे का, असा सवाल वन मंत्री मुनगंटीवार यांना करण्यात आला आहे.