बांगलादेशचा साडेतीन दिवसांत खात्मा केल्यानंतर हिंदुस्थानी संघात बदलाची अपेक्षा नव्हतीच आणि निवड समितीने तोच 16 सदस्यीय संघ येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूर कसोटीसाठीही कायम ठेवला आहे. चेन्नई कसोटीत हिंदुस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांनी घोर निराशा केली होती. त्यात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुल हेच तीन फलंदाज आहेत, ज्यांना दोन्ही डावांत काहीही करता आले नव्हते. दुसऱ्या कसोटीसाठी निवड समितीने 16 सदस्यीय संघ कायम ठेवला असला तरी अंतिम 11 खेळाडूंत के. एल. राहुलऐवजी सरफराज खानला संधी मिळणे अपेक्षित आहे. राहुलला दोन्ही डावांत फलंदाजीची संधी मिळाली होती, पहिल्या डावात तो 16 धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात तो 22 धावांवर नाबाद राहिला. सरफराजने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेद्वारे कसोटी पदार्पण करताना 5 डावांपैकी 3 डावांत अर्धशतके ठोकली होती. तरीही त्याला चेन्नई कसोटीत स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे कानपूर कसोटीत राहुलऐवजी सरफराजच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. वेगवान गोलंदाजीतही मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांची कामगिरी समाधानकारक असल्यामुळे दोघांपैकी एकाला वगळून यश दयालला पदापर्णाची संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी हिंदुस्थान संघ
रोहित शर्मा (कर्णधार), गिल, जैसवाल, कोहली, राहुल, सरफराज, जाडेजा, पंत, जुरेल, अश्विन, पटेल, यादव, सिराज, बुमराज, आकाश दीप, यश दयाल.