सरफराजची पुन्हा कसोटी, कानपूर कसोटीऐवजी इराणी करंडकातच खेळविण्याची शक्यता; जुरेल आणि यश दयाललाही मुक्त करणार

पदार्पणात दमदार कामगिरी केल्यानंतरही संघात स्थान मिळविण्यासाठी धडपडत असलेल्या सरफराज खानचा दुसऱ्या कसोटीतूनही पत्ता कट केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्याला कानपूर कसोटीऐवजी येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी करंडकात मुंबई संघातून खेळावे लागणार असल्याचे अंदाज वर्तवले जात आहे. शेष हिंदुस्थानविरुद्ध होणाऱ्या या लढतीसाठी सरफराजची मुंबई संघात निवड करण्यात आली आहे. तरीही शेवटच्या क्षणी कानपूर कसोटीसाठी अंतिम अकरामध्ये त्याची निवड झाली तर तो इराणी करंडकात खेळणार नाही. मात्र कानपूरलाही तो बाकांवर बसला तर त्याला लखनऊचे तिकीट देऊन इराणी करंडकात खेळवून त्यांचे सांत्वन केले जाऊ शकते.

तसेच राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी इशान किशनला शेष हिंदुस्थान संघात स्थान देण्यात आले असून सध्या कसोटी संघात असलेल्या ध्रुव जुरेलचीही निवड करण्यात आली आहे. मात्र शेष हिंदुस्थानचे यष्टिरक्षण कोण करणार हे अद्याप निश्चित नाही.

27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या कानपूर कसोटीसाठी हिंदुस्थानी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र चेन्नई कसोटीत के. एल. राहुलच्या बॅटमधून धावा निघाल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला विश्रांती देत सरफराज खानला मधल्या फळीत खेळविले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र सरफराजची येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या इराणी करंडकासाठीही रणजी विजेत्या मुंबई संघात निवड करण्यात आली आहे. एकाचवेळी दोन्ही संघात निवड झाल्यामुळे पुन्हा एकदा सरफराजला हिंदुस्थानच्या अंतिम अकरा जणांच्या संघात स्थान मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. परंतु सरफराजला कानपूर कसोटीत अंतिम अकरांत स्थान मिळाले तर तो इराणी करंडक खेळणार नाही, मात्र कसोटीत संधी मिळाली नाही तर तो लखनऊला रवाना होईल.

कानपूर कसोटी 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान खेळविली जाणार असून इराणी करंडकाचा सामना कानपूरपासून 90 किमी अंतरावर असलेल्या लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. तसेच यष्टिरक्षक ध्रुव जुरेल आणि गोलंदाज यश दयाल हे सुद्धा दोन्ही संघात आहे. या दोघांनाही कानपूर कसोटीत संधी मिळण्याची शक्यता कमीच असल्यामुळे हे दोघेही लखनऊला खेळताना दिसू शकतात. पण इराणी करंडकात इशानचीही निवड झाली आहे. जर जुरेलला यष्टिरक्षक म्हणून खेळवले तर इशान किशनला फलंदाज म्हणून खेळविले जाणार का? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे. सध्याची रणनीती पाहता हे दोघेही इराणी करंडकातच खेळण्याची शक्यता अधिक आहे.

 

इशानला आणखी एक संधी

हिंदुस्थानी संघाबाहेर फेकल्या गेलेल्या इशानने गेल्याच आठवडय़ात आपल्या बॅटची फटकेबाजी अवघ्या हिंदुस्थानला दाखवली. आता त्याची शेष हिंदुस्थान संघातही निवड करण्यात आली असून त्यातही त्याची बॅट तळपली तर तो पुन्हा एकदा हिंदुस्थानी संघासमीप पोहचू शकेल. त्याचा खेळ पाहता इशानला हिंदुस्थानी संघापासून फार काळ दूर ठेवणे निवड समितीला शक्य होणार नाही. त्याचा कसोटी संघासाठी सध्या विचार होऊ शकत नसला तरी तो वन डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये हिंदुस्थानी संघाचे लवकरच प्रतिनिधित्व करेल.

शेष हिंदुस्थान : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, इशान किशन (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), मानव सुतार, सारांश जैन, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चहर

मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, सरफराज खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सिद्धांत अधटराव (यष्टिरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, हिमांशु सिंग, शार्दुल ठाकूर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनेद खान, रॉयस्टन डायस.