मुंडे बहीण-भावाने संगनमताने धाक दाखवून आणि कटकारस्थान रचून आमची कोट्यवधी रुपयांची जमीन कवडीमोल किंमतीत खरेदी केली, असा गंभीर आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी आहेत, तर प्रवीण महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू होते.
सारंगी महाजन यांनी पत्रकार परिषद घेत पंकजा मुंड आणि धनंजन मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. प्रवीण महाजन यांच्या नावावर असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर 240 मधील कोट्यवधी रुपये किमतीची 36.50 आर जमीन मुंडे बहीण-भावाने जबरदस्तीने घेतल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला. ऐन विधानसभा निवडणुकीत झालेल्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
परळीमध्ये आमची 63.50 आर जमीन होती. यातील 36 आर जमीन फसवणूक करून विकण्यात आली. मला परळीच्या हॉटेलमध्ये बोलून घेतले आणि तिथून थेट रजिस्टार ऑफिसला नेले. तिथे माझ्याकडून सही करून घेतली. जमीन कुणी घेतली हे माहिती नाही. तिथून आम्हाला गोविंद मुंडेने घरी नेले, खाऊपिऊ घातले आणि नंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. विरोध केला असता सही केल्याशिवाय धनुभाऊ परळी सोडू देणार नाही, अशी धमकी देण्यात आली, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.
एवढे सगळे झाल्यावर गोविंद मुंडे याने आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडले. त्यानंतर आमच्याकडून एक लाख रुपयेही घेतले, असा दावाही त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली असून विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
आमच्या पक्षाची भूमिका ‘बटेंगे तो कटेंगे’ची नाही! – पंकजा मुंडे