सुप्रसिद्ध सारंगी वादक राम नारायण यांचे निधन

जागतिक कीर्तीचे सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण (97) यांचे शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडसह संगीत सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, आज सायंकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

राम नारायण यांचा जन्म 25 डिसेंबर 1927 रोजी उदयपूरजवळील आमेर गावात झाला. त्यांचे आजोबा हरलालजी बियावत आणि वडील नथुजी बियावत शेतकरी आणि गायक होते. त्यांनी सारंगीला भारतीय शास्त्राrय संगीतातील एकल वाद्य म्हणून लोकप्रिय केले. 1956मध्ये सोलो कॉन्सर्ट करणारे ते पहिले कलाकार बनले. त्यानंतर त्यांनी देशातील अनेक प्रमुख संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरण केले, अनेक अल्बम रेकॉर्ड केले. 1964मध्ये त्यांनी मोठा भाऊ तबला वादक चतुर लाल यांच्यासोबत अमेरिका आणि युरोपचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केला. 2005मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित केले होते.

सारंगीतील एक पर्व संपले 

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी जगविख्यात सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. त्यांनी देश-विदेशात अनेक शिष्य घडवले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चातदेखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतील एक पर्व संपले, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.