धनंजयला सरकारी पाहुणा करा! सारंगी महाजन कडाडल्या

परळीच्या भावाबहिणीने  माणुसकीला काळिमा फासला आहे. या दोघांचे हात बरबटलेले आहेत. हे सगळे टोळभैरव आहेत. धनंजयलाही सरकारी पाहुणा करा, सरकारी जेवण द्या, जरा कोठडीची हवा खाऊ द्या, एवढे सगळे घडल्यावर त्याने स्वतःहून मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता, आमदारकीही सोडायला पाहिजे होती… अशा शब्दांत सारंगी महाजन कडाडल्या.

स्व. प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांना अश्रू आवरले नाहीत. त्यांचे आणि माझे दुःख वेगळे नाही. सतरा वर्षांपूर्वी हेच दुःख मी सहन केले. फरक एवढाच आहे की, माझी लढाई मी एकटीच लढते आहे. देशमुखांच्या सोबत त्यांचे गाव आहे. मला देशमुख कुटुंबाचे दुःख पाहावले नाही. कसे होईल या कुटुंबाचे… लहान लहान लेकरं आहेत. आज माझ्याजवळ काही नाही, पण माझ्या जमिनीचा वाद मिटल्यानंतर येणाऱ्या पैशातून मी या कुटुंबाला नक्कीच मदत करणार आहे, असे सारंगी महाजन म्हणाल्या.

देशमुख कुटुंबाला भेटण्यासाठी अजूनही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना वेळ मिळाला नाही, असा प्रश्न विचारला असता सारंगी महाजन यांनी दोघे बहीण-भाऊ माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. कराडाच्या समर्थनासाठी परळी बंद झाली नाही, तर दहशतीपोटी बंद झाली, असेही त्या म्हणाल्या. दोघांचे विमान सध्या फार उंचावर आहे. जनताच हे विमान आता खाली उतरवेल, असा टोलाही सारंगी महाजन यांनी लगावला.