सारा तेंडुलकरवर वडिलांनी सोपवली मोठी जबाबदारी, फाउंडेशनच्या संचालकपदी नियुक्ती

क्रिकेटचा देव म्हणून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची जगात ख्याती आहे. शांत स्वभावाच्या सचिनने मैदानामध्ये भल्यभल्या गोलंदाजांना अस्मान दाखवत त्यांची धुलाई केली आहे. त्यामुळे सचिनच्या फलंदाजीचे जलवे आजही मोठ्या अभिमानाने सांगितले जातात. 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सचिनने 2018 साली सचिन तेंडुलकर फाउंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या संचालक पदाची मोठी जबाबदारी आता सारा तेंडुलकरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

सचिन तेंडुलकरने स्वत: एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. “मला हे सांगालया खूप आनंद होतोय की माझी मुलगी सारा ‘सचिन तेंडुलकर फाऊंडेशन’ची संचालिका म्हणून जॉईन होणार आहे. साराने लंडनमधील युनिव्हर्सिीटी कॉलेजमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशनमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. तसेच साराने क्रीडा, आरोग्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून देशाला सक्षम बनवण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला आहे. जागतिक शिक्षण कशा पद्धतीने पूर्ण करत येऊ शकते याची आठवण करून देणारी ही गोष्ट आहे.” असे सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.