संतोष देशमुख हत्येप्रकरणी SIT चौकशी अहवालानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं विधान

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीसह एसआयटीकडूनही तपास करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात खंडणीच्या आरोपावरून वाल्मीक कराड याला अटक करून त्याची पोलीस कोठडीत रवानी झाली आहे. या सर्व प्रकरणामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. यावर भाजपचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराड याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला नसला तरी तोच याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे. आणि हा वाल्मीक कराड अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. बीडमधील सर्वपक्षीय मोर्चातून ही मागणी करण्यात आली. तसेच तपास नि:पक्षपातीपणे करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे बोलले जात आहे. यावरून आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी मोठे विधान केले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नेमलेल्या एसआयटी चौकशीचा अहवाला येऊ द्या मग निर्णय होईल, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

नैतिक जबाबदारी म्हणून… – सुप्रिया सुळे

पवारसाहेब जेव्हा मुख्यमंत्री तेव्हा त्यांच्या मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा त्या काळात त्या-त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामे दिले. काँग्रेस सरकार असताना अशोच चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिलाच होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो निर्णय घ्यावा.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे- प्रणिती शिंदे

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. या पूर्ण प्रकरणात ते आहेत असं दिसून येतंय. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात राजीनामा मागितले जायचे. आणि तेव्हा नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामे दिले जायचे. पण हे अतिशय निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे. लवकर हलेल असं दिसत नाही, अशी टीका काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.