बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येप्रकरणी विरोधकांनी आवाज उठवल्यानंतर राज्य सरकारने कारवाईला वेग दिला आहे. हत्येच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची सरकारने नियुक्ती केली आहे. शनिवारी बीडच्या पोलीस अधीक्षकपदी नवनीत कांवत यांची नियुक्ती केली होती. देशमुख यांच्या मारेकऱयांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीडसह संपूर्ण राज्याचे वातावरण तापले आहे. या घटनेवरून विरोधकांनी सरकारला घेरले असून कारवाईची ठोस पावले उचलण्यास भाग पाडले आहे. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारने देशमुख यांच्या हत्येच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नेमणूक केली. सरकारतर्फे विधी व न्यायपालिका विभागप्रमुख वैशाली बोरुडे यांनी अॅड. कोल्हे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.
फौजदारी प्रकरणांत कोल्हे यांचा अनुभव
हत्येच्या खटल्यात आरोपींविरोधात ठोस बाजू मांडण्याची जबाबदारी अॅड. कोल्हे यांच्यावर असून त्यांची फी गृह विभाग देणार आहे. कोल्हे यांना फौजदारी प्रकरणांत मोठा अनुभव, माहिती व अभ्यास आहे. त्यांनी अनेक आरोपींना शिक्षा सुनावण्यात यश मिळवले आहे. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांत दोषत्व सिद्ध करीत प्रकरणे निकाली काढली आहेत. त्यामुळे त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केल्याचे विधी व न्यायपालिका विभागाने म्हटले आहे.