आधी बंदूक बंदूक आणि रेती रेती, धस यांचे आता मांडवली… मांडवली; हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र

मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आक्रमक भूमिका घेणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीवरून धस यांनी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, आधी बंदूक बंदूक आणि रेती रेती असे सुरू होते. आता मांडवली… मांडवली सुरू आहे, अशा शब्दांत धस यांच्यावर निशाणा साधला.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, पहिले आगा आगा आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती रेती, टिप्पर टिप्पर टिप्पर असे शब्द रांगडय़ा भाषेत मांडले जात होते. मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता मांडवली… मांडवली… या शब्दाची गुंज या प्रकरणातून ऐपू येत आहे. टीआरपी वाढवण्याकरता केलेले हे सगळे प्रकरण होते. अजितदादा गटाचे महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार धस यांना दिलेली सूचना होती, असा आरोप त्यांनी केला.

संतोष देखमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत का – सुप्रिया सुळे

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पाचवा आरोपी साठ दिवस उलटूनही सापडत नाही. परंतु, एका नेत्याच्या घरातून मुलगा गायब झाल्यावर सर्व शासकीय यंत्रणा सक्रिय होते. बारावीची परीक्षा सोडून न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत का, असा संताप खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.