
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आंधळे याच्याकडे पाच वाहने असून धारूर व केज येथील बँकेत तीन खाती असल्याचे चौकशीत आढळले आहे.
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. तेव्हापासून कृष्णा आंधळे हा फरार असून अद्याप पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आंधळे याचा कोणताही धागादोरा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याला फरार घोषित केल्यानंतर त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी सीआयडीने न्यायालयाकडे मागितली होती.
मस्साजोग ग्रामस्थांची आज महत्त्वाची बैठक
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी अद्याप अनेक आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. या प्रकरणातही आणखीही आरोप असल्याचा दावा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. त्यांची नावेही त्यांनी जाहीर केली आहेत, परंतु अद्याप पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले नाही. याच पार्श्वभूमीवर उद्या मस्साजोगमधील ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीत देशमुख हत्याप्रकरणी पुढची दिशा ठरवली जाणार आहे.