आका सोडून आठजणांना मोक्का! संतोष देशमुख हत्या प्रकरण… वाल्मीक कराडला वाचवले; फक्त खंडणीचा गुन्हा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आठ आरोपींवर ‘मकोका’अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र अख्ख्या महाराष्ट्राने जंग जंग पछाडूनही या प्रकरणातील ‘आका’ वाल्मीक कराडवर मात्र खंडणीव्यतिरिक्त दुसरा कोणताही गुन्हा नोंदवण्याची हिंमत तपास यंत्रणांची झाली नाही. त्याच्यावर फक्त खंडणीचाच गुन्हा दाखल असून, त्याचा तपासही गुलदस्त्यातच आहे. हत्या प्रकरणातील सात आरोपी कोठडीत असून, आठवा आरोपी अजूनही तपास यंत्रणांना खेळवत आहे.

पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली. हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना ‘मकोका’ लावण्यात यावा, अशी जोरदार मागणी राज्यभरातून करण्यात येत आहे. त्याचबरोबर या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात वाल्मीक कराड हा सीआयडीला शरण आला आहे. हत्येशीच हे प्रकरण संबंधित असल्यामुळे वाल्मीक कराडवरही ‘मकोका’ लावण्यात यावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नागपूर येथे विधिमंडळात संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, आरोपींना ‘मकोका’ लावणार असल्याचे जाहीर सांगितले होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अगोदर विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आठवड्यांनी पुण्यातून सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कल्याण येथून सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेण्यात आले. हे सर्व जण सध्या सीआयडीच्या कोठडीत असून, आज त्यांच्यावर ‘मकोका’ लावण्यात आला. फरार कृष्णा आंधळेवरही ‘मकोका’ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्या शोधासाठी सीआयडी तसेच पोलिसांची कित्येक पथके वणवण करीत आहेत.

मकोका का लागला?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यावर दहा वर्षांत दहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. केज पोलीस ठाण्यात आठ गुन्हे असून, त्यात मारहाणीचे चार, चोरीचा एक तर अपहरणाचा एक, खंडणीचा एक अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. महेश केदार याच्यावर पाच गुन्हे दाखल असून, 21 वर्षांच्या जयराम चाटेवर तीन गुन्हे दाखल आहेत. प्रतीक घुले याच्यावर पाच गुन्हे असून, फरार कृष्णा आंधळेवर सहा गुन्हे नोंद आहेत.

वाल्मीक कराड सीआयडीच्या सरबराईत

अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. खंडणीच्या प्रकरणात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे खासम् खास वाल्मीक कराड यांचे नाव आले. त्यांच्यावर खंडणी प्रकरणात गुन्हाही दाखल झाला. दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित असल्यामुळे कराडवरही ‘मकोका’ लावण्यात यावा, अशी मागणी होत असताना तपास यंत्रणांची मात्र त्याला हात लावण्याची हिंमत झाली नाही. वाल्मीक कराड सध्या कोठडीत सीआयडीचा पाहुणचार घेत आहे.