मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीडसह अंबाजोगाई, गेवराईत निषेध रॅली काढली. धारूर, आष्टी, केज, शिरूर, माजलगाव, परळी, पाटोद्यातील बाजारपेठा बंद होत्या. बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवला होता.
संतोष देशमुख यांची चार दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल मराठा समाजासह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने बंदची हाक दिली. बंदला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच जिल्हयातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट होता. आमदार संदीप क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते यांच्या नेतृत्वाखाली बीड शहरात निषेध रॅली काढली.
माजलगाव कडकडीत बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ माजलगाव कडकडीत बंद होते. या घटनेची चौकशी सीआयडीमार्फत करून दोषींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करण्यात आली. शहरातील बाजारपेठ, हॉटेल, शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती. आंबेडकर चौकातून सर्वपक्षीय शांतता रॅली काढली.
धारूरमध्ये शाळा, कॉलेज बंद
दोषींवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी धारूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ बंद ठेवून निषेध केला.
गेवराईत शुकशुकाट
गेवराईमध्ये व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला. शहरासह ग्रामीण भागातदेखील बाजारपेठा बंद होत्या.
अंबाजोगाईत उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबाजोगाईत सकाळपासून संपूर्ण शहर बंद ठेवण्यात आले होते. शहरामध्ये सकाळी निषेध रॅली काढण्यात आली.
केज कडकडीत बंद
सकाळपासून केज कडकडीत बंद होते. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण वाहतूक ठप्प होती. बाजारपेठा बंद होत्या.
चार आरोपी फरारच
संतोष देशमुख हत्या प्रकरणात केज पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला असून प्रतीक घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या तिघांना अटक केली आहे, तर सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे हे चौघे अजून फरारच आहेत.