
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 70 दिवस उलटले तरी मारेकरी सापडत नाहीत. अटकेतील आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी वेस्टिन हॉटेल येथे मराठा आंदोलक जमले होते, मात्र अमित शहा यांनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन काही वेळानंतर सोडून दिले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी कोरेगाव पार्क येथील वेस्टिन हॉटेलमध्ये पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीसाठी आले होते. दरम्यान, बैठक सुरू असतानाच मराठा आंदोलक हॉटेलच्या गेटवर दाखल झाले. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. तसेच फरार आरोपीला अटक करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रकरणात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले असून याबाबत अमित शहा यांना भेटण्याची मागणी आंदोलकांनी केली, मात्र पोलिसांनी त्यांना अडविले. आंदोलक आक्रमक होताच पोलिसांनी गाडीत बसवून त्यांना मुंढवा पोलीस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी समज देऊन आंदोलकांना सोडण्यात आले.