वाल्मीक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी तपासासाठी राज्य सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. वाल्मीक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीच्या आरोपाखाली वाल्मीक कराड याला न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाल्मीक कराडवरून विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मोठे विधान केले. मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या (वाल्मीक कराड) लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे. म्हणून मोठ्या आकाला वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका, अशी आपली पोलिसांना विनंती आहे. हा बिचारा म्हणणार नाही. पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे. ही माहिती जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.