धनंजय मुंडेंना हाकला, कराडला फासावर लटकवा; बीडमध्ये दहशतवादाविरोधात जनता रस्त्यावर उतरली, अतिप्रचंड आक्रोश मोर्चा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱया आरोपींना अटक करून फासावर लटकवा, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला आणि वाल्मीक कराडला अटक करा अशी मागणी करीत आज संपूर्ण बीड जिल्हा दहशतवादाच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांसह रस्त्यावर उतरला. या अतिविराट आक्रोश मोर्चात आरोपींना सोडू नका, असा संताप व्यक्त करीत संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. बीडकरांच्या या रौद्रावतारामुळे कुंभकर्णी गृह खात्याला झिणझिण्याच आल्या. यावेळी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

पवनचक्कीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली. या हत्येला 19 दिवस उलटले, परंतु अजूनही तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राणा भीमदेवी थाटात कुणालाही सोडणार नाही, अशा वल्गना केल्या. परंतु या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अजूनही राजकीय संरक्षणात सुरक्षित आहे. पोलिसांचा तपास कासवापेक्षाही संथगतीने चालू असून सामान्य जनतेमध्ये यामुळे प्रचंड असंतोष आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात यावी, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकलण्यात यावे आदी मागण्यांसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही निमंत्रणाची वाट न बघता लाखो बीडकर या मूक मोर्चात सहभागी झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करून मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचला तेव्हा रस्त्यावर मुंगीलाही शिरकाव करायला जागा उरली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चा मूक असला तरी सामान्य नागरिकांच्या मनातील संताप, खदखद यानिमित्ताने व्यक्त झाली. जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. रस्त्यावरच उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर मोर्चात सहभागी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला आणि वाल्मीक कराडला बेडय़ा ठोका आदी मागण्या केल्या.

या मूक मोर्चामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार अभिमन्यू पवार, खासदार बजरंग सोनवणे, संभाजीराजे छत्रपती, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे-पाटील, नरेंद्र पाटील, माजी आमदार सय्यद सलीम, ज्योती मेटे, दीपक केदार, मोहन जगताप, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, रत्नाकर शिंदे, राजेंद्र मस्के आदी सहभागी झाले होते.

वाल्मीक कराडला मुंडेंचे संरक्षण – संदीप क्षीरसागर

संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस उलटून गेले. पण अजून पोलिसांना आरोपी सापडत नाहीत. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी न्याय करण्याचा शब्द दिला होता. पण पोलिसांचे हात अजून मास्टरमाइंड वाल्मीक कराडपर्यंत पोहोचले नाहीत. कारण या कराडला धनंजय मुंडेंचे संरक्षण आहे, असा थेट आरोप आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणीही त्यांनी केली.

न्याय करा नाहीतर महाराष्ट्र पेटेल जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

बीडमधील मूक मोर्चा हा सरकारला इशारा आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय द्या, नाहीतर महाराष्ट्र पेटेल, असा गंभीर इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. त्रेतायुगात वाल्याचा वाल्मीक झाल्याचे आपण ऐकले, मात्र कलियुगात वाल्मीकचा वाल्या झाल्याचे आपण पाहत आहोत. या वाल्याने बीडचा सत्यानाश केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोण आका, कोण आकाचा बाप, तत्काळ शोध घ्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. नसता सरकारला पळताभुई थोडी होईल, असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

2 जानेवारीपासून उपोषणाला बसणार बजरंग सोनवणेंचा निर्धार

संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा मी अधिवेशनात होतो. तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून माहिती दिली. त्यानंतर वाल्मीक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला. धनंजय मुंडे यांच्यामुळेच ही गुंडगिरी वाढली. त्यामुळे अगोदर त्यांचाच राजीनामा घेतला पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडवर गुन्हा दाखल करा, त्याला अटक करा. नसता 2 जानेवारीपासून आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

यापुढे जशास तसे उत्तर द्या, मनोज जरांगे यांचा संताप

पुन्हा कुणाचा संतोष देशमुख होता कामा नये यासाठी यापुढे गुंडगिरीला जशास तसे उत्तर द्या, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला. व्यासपीठावरील सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आरोपींना अटक होत नाही, आरोपींना पाठीशी घालणारांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत तेथेच ठाण मांडून बसावे, असे आवाहन या वेळी त्यांनी केले. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

पालकमंत्री पद भाडय़ाने देणाऱयाला हाकला – प्रकाश सोळंके

गेली पाच वर्षे पालकमंत्री पद वाल्मीक कराडला भाडय़ाने देणाऱया धनंजय मुंडे यांना तत्काळ मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली. अमर्याद अधिकार मिळाल्याने वाल्मीक कराडची गुंडगिरी फोफावली, असा आरोपही त्यांनी केला. धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत या प्रकरणात न्यायाची अपेक्षा करता येणार नाही, असेही ते म्हणाले. देशमुख कुटुंबाला आधार देण्यासाठी आपल्या पक्षाकडून 40 लाख रुपयांचा निधी गोळा करण्यात आला असून तो 4 जानेवारी रोजी त्यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा खून – अंजली दमानिया

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींचा खून झाला असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांना आलेल्या एका व्हॉट्सऍप कॉलचा हवाला देत केला आहे. दमानिया म्हणाल्या, ‘काल रात्री मला 11.30 वाजेच्या दरम्यान फोन आला. मला व्हॉट्सऍप कॉलवर याबाबत सांगितले. फोन लागला नाही. त्यांनी मला व्हॉइस मेसेज पाठवला. त्यात त्याने सांगितले की, देशमुख हत्या प्रकरणातील फरार लोक कधीच भेटणार नाहीत. त्या तिघांची हत्या झाली आहे. ती जागाही कॉल करणाऱयाने सांगितली. हे खरे-खोटे मला माहीत नाही. यासंदर्भातील सर्व माहिती आपण बीडच्या एसपींना दिली आहे. त्यामुळे पुढील चौकशी करण्याचे त्यांचे काम आहे, मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली.’

महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे अतिशय निंदनीय! – प्राजक्ता माळी

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडमधील ‘इव्हेंट पॉलिटिक्स’वरून केलेल्या विधानावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने शनिवारी संतप्त प्रतिक्रिया दिली. धस यांच्या निराधार विधानामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्यांनी महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याबरोबर महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचे विधान अतिशय निंदनीय असून त्यांनी जाहीर माफी मागायलाच हवी, अशी ठाम भूमिका प्राजक्ताने पत्रकार परिषदेत मांडली. कलाकार म्हणून वेगवेगळय़ा शहरांत जाणे, प्रेक्षकांचे मनोरंजन करणे हे आमचे काम आहे. परळीच नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात जाऊन मी काम केले असून यापुढेही करणार. राजकीय नेत्यांबरोबरच्या फोटोचा संदर्भ घेऊन कुणाहीबरोबर नाव जोडण्याचे कृत्य शोभत नाही, असा संताप तिने व्यक्त केला. धस यांच्या विधानाबाबत महिला आयोगाकडे तक्रार केली असल्याचेही तिने सांगितले.

माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे. काहीही गुन्हा नसताना त्यांना जीव गमवावा लागला. काल ढगाळ वातावरण होते. सूर्यदर्शन झाले नाही. आज ढग नाहीसे झाले. सूर्यदर्शन झाले. मात्र मला आता माझ्या वडिलांचे दर्शन कधीच होणार नाही. ही वेदना मला स्वस्थ झोपू देत नाही. आता तुम्हीच मायबाप… – वैभवी देशमुख

मुंडेंनी कराडला मंत्रीपद भाड्याने दिले

मनासारखे झाले नाही की, ‘गोली मार भेजे में’ ही संस्कृती धनंजय मुंडे यांनी परळीत आणली, असा स्पष्ट आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. धनंजय मुंडे यांनी वाल्मीक कराडला आपले मंत्रिपदच भाडय़ाने दिले होते. त्यामुळेच ही गुंडगिरी फोफावली, असे धस म्हणाले.

फरार आरोपींची संपत्ती जप्त करा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहेत. तसेच ज्यांचे बंदुकीसोबत फोटो प्रसिद्ध झाले आहेत त्याची खातरजमा करून त्यांचे बंदूक परवाने रद्द करा, असे आदेशही त्यांनी दिले.