फडणवीसांची पाठ वळली अन् बीड हादरलं; वाल्मीक कराडच्या बातम्या बघतो म्हणून तरुणाला बेदम मारहाण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. वाल्मीक कराडला सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून या प्रकरणातील कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्यापही फरार आहे. याच फरार आरोपीच्या मित्रांनी बीडमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बीडमध्ये आले होते. त्यांची पाठ वळताच धारुर गावात मारहाणीची धक्कादायक घटना घडली.

वाल्मीक कराडच्या बातम्या बघतो म्हणून कृष्णा आंधळेच्या मित्रांनी तरुणाला मारहाण केली. तसेच ‘तुझा संतोष देशमुख करू’, अशी धमकीही आरोपींनी दिली. जबर मारहाणीमध्ये अशोक शंकर मोहिते हा तरुण जखमी झाला आहे. त्याच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर वैजनाथ बांगर, अभिषेक सानप अशी आरोपींची नावे असून त्यांच्याविरोधात धारूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

नक्की काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक शंकर मोहिते हा तरुण धारूर गावामध्ये संतोष देशमुख हत्याकांड आणि वाल्मीक कराडशी संबंधित बातम्या आपल्या मोबाईलवर पाहत होता. यावेळी या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे मित्र वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप तिथे आले. संतोष देशमुख आणि वाल्मीक कराडच्या बातम्या का बघतोस असा प्रश्न विचारत त्यांनी अशोकला मारहाण सुरू केली. मुंडे साहेबांच्या आणि वाल्मीक अण्णाच्या बातम्या बघतना पुन्हा दिसला तर तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी आरोपींनी दिली.