
जिल्हा कारागृहात टोळीयुद्ध झाल्यानंतर कारागृह प्रशासनाने मकोका लावण्यात आलेल्या सनी आठवले गँगला नाशिकला हलवले आहे. बापू आंधळे खून प्रकरणातील महादेव गितेसह इतर चौघांना हर्सूलला पाठवण्यात आले आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या मेहेरबानीने पंचतारांकित सेवेचा लाभ घेत असलेल्या वाल्मीक कराड आणि गँगला हलवण्याचे धाडस पोलिसांना झाले नाही. उलट कारागृहात कराड गँगला सेवा पुरवण्यासाठी पोलिसांमध्ये चढाओढ सुरू असल्याची माहिती आहे.
बीड जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त पैदी ठासून भरण्यात आले आहेत. कच्चे कैदी, शिक्षा झालेले कैदी, मकोका लावण्यात आलेल्या गँग यामुळे कारागृह खचाखच भरले आहे. पैद्यांना पंचतारांकित सुविधा देण्यासाठी कारागृह कर्मचाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असते. यात मोठा आर्थिक व्यवहारही दडलेला आहे. वाल्मीक कराड आणि त्याची गँग कारागृहात मुक्कामी असल्यामुळे कारागृह कर्मचाऱ्यांची रोजच दिवाळी असते. कराड गँगची सेवा करता, आम्ही काय घोडे मारले, या वादातून सोमवारी कारागृहात जोरदार राडा झाला. त्यानंतर कारागृह प्रशासनाने सनी आठवले गँगची रवानगी नाशिकला केली. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गिते आणि इतर चौघांना हर्सूलला पाठवण्यात आले.
वाल्मीक कराडच्या सेवेत बाधा नको म्हणूनच…
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहा आरोपी बीड कारागृहात आहेत. वाल्मीक कराडला सर्व सुविधा पुरवण्यात काही पैदी बाधा आणत होते. त्यामुळेच पैद्यांची हलवाहलवी करण्यात आल्याचा स्पष्ट आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी केला.