वाल्मीक कराडच सूत्रधार, संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीकडून 1800 पानांचं आरोपपत्र दाखल

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. आवादी कंपनीकडून खंडणी उकळण्यात अडथळा ठरत होता म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे.

सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मीक कराड पहिल्या नंबरचा आरोपी आहे. विष्णू चाटे दुसऱ्या, सुदर्शन घुले तिसऱ्या, प्रतिक घुले चौथ्या, सुधीर सांगळे पाचव्या, महेश केदार सहाव्या, जयराम चाटे सातव्या करत फरार कृष्णा आंधळे आठव्या नंबरचा आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे फरार आहे. पोलीस, सीआयडी पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र हे हत्याकांड घडून 70 दिवस झाले तरी तो हाती लागलेला नाही.

29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मीक कराडने अवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि सुधीश सांगळे यांच्याशी खटका उडाला होता, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली होती. त्यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले होते. यात आरोपी स्पष्ट दिसत असून या व्हिडीओचे पुरावेही सीआयडीने आरोपपत्रासोबत जोडले आहेत. वाल्मीक कराडने अवादा कंपनीकडे 2 कोटी रुपये खंडणी मागितली होती आणि त्यात संतोष देशमुख अडथळा ठरत होते. म्हणून वाल्मीकने त्यांच्या हत्येचा कारस्थान रचले, असेही सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे.

दोघांची नावं वगळली

सीआयडीने सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांची नावे आरोपपत्रातून वगळली आहे. सिद्धार्थ हा हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी होता, मात्र त्याच्याविरोधात कुठलेच पुरावे सापडले नाही. तर रणजित मुळे हा अॅट्रोसिटी प्रकरणातील आरोपी होता. त्याच्याविरोधातही कुठला पुरावा न आढळल्याने दोघांचीही नावे वगळण्यात आली आहेत.