मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोक्काचा गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वाल्मीक कराडला बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बीडच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. याआधी खंडणीच्या गुन्ह्यातही वाल्मीकला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, चौकशी पूर्ण झाल्याने सीआयडीने वाढीव कोठडीची मागणी न केल्याने न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे सीआयडीने कराडच्या कोठडीचा अधिकार अबाधित ठेवला आहे. त्यामुळे गरज पडल्यास सीआयडी कराडच्या कोठडीची मागणी करू शकते.
वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी पोलिसांची मिलीभगत, विष्णू चाटेलाही दिली जेल चॉइस; दमानियांचे गंभीर आरोप
कृष्णा आंधळे फक्त कागदोपत्री फरार
वाल्मीक कराड आणि आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज हे खात्रीलायक पुरावा आहे. सीआयडी, एसआयटीकडे पुरावा सादर झाला आहे. कृष्णा आंधळे दोन वर्षापासून फरार असल्याचे म्हणतात. पण सीसीटीव्हीमध्ये तो दिसत आहे. तो फक्त कागदोपत्री फरार असून पोलिसांसोबत दिसत आहे. यावर उत्तर द्यावे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली. तसेच वाल्मीकला न्यायालयीन कोठडी हा न्यायप्रक्रियेचा भाग असून आम्हाला न्याय मिळण्यासाठी ठोस पावलं कुठेतरी कमकूवत पडू नये, असेही ते म्हणाले.
एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबाला धोका!
वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आताच द्यायला नको होती. कारण खुप मोठा तपास बाकी असून खंडणी आणि खुनातले आरोपी एकच आहेत. हे खुप मोठे षडयंत्र आहे. एकही आरोपी सुटू देऊ नका, अशी मागणीही मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केली. वाल्मीक कराडला सहआरोपी केले नाही तर राज्य बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला. तसेच खून करणाऱ्यापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचून गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे. याला मुख्य आरोपी करा. यातील एक जरी आरोपी सुटला तरी देशमुख कुटुंबाला धोका आहे, असेही ते म्हणाले.