मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड सुदर्शन घुले (26), सुधीर सांगळे (23) या दोघांना शनिवारी पहाटे पुण्याच्या बालेवाडी भागात जेरबंद करण्यात आले. सरपंचाची टीप देणाऱया सिद्धार्थ सोनवणेला कल्याणमध्ये बेडय़ा ठोकण्यात आल्या. तर आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणारा डॉ. संभाजी वायबसे याला पत्नीसह नांदेडातून ताब्यात घेण्यात आले. या सर्वांची केज न्यायालयाने 14 दिवसांसाठी सीआयडी कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी आतापर्यंत विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार यांना अटक करण्यात आली असून ते सध्या सीआयडीच्या कोठडीत आहेत. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे तीन आठवडय़ांपासून पोलीस, सीआयडीला गुंगारा देत होते. तेरा विशेष पथके आणि 115 पोलीस या तिघांच्या मागावर होते. परंतु आरोपी सापडत नसल्यामुळे तपास यंत्रणांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
बालेवाडीजवळ खोलीत मुक्काम
संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर सुदर्शन, सुधीर आणि कृष्णा मुंबईकडे पळाले. भिवंडीत एका मित्राकडे त्यांनी दोन दिवस मुक्काम केला. तेथेच जुने सीमकार्ड फेकून दिले आणि नवे सीमकार्ड घेतले. पोलिसांना त्यांच्या वास्तव्याचा सुगावा लागताच या आरोपींनी तेथून पळ काढला आणि पुणे गाठले. बालेवाडी भागात एका खोलीत हे सुदर्शन आणि सुधीर दोघेही लपून बसले होते. पहाटेच पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून त्यांना ताब्यात घेतले. कृष्णा आंधळे हा मात्र या दोघांच्या बरोबर नव्हता. त्याच्या शोधासाठी पथके पुन्हा रवाना करण्यात आली आहेत. खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मीक कराडही पुण्यातच मुक्कामी होता हे विशेष!
सिद्धार्थ सोनवणेचाही माग लागला
डॉ. संभाजी वायबसेच्या चौकशीत सिद्धार्थ सोनवणे याचे नावही समोर आले. याच सिद्धार्थने 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख केजवरून मस्साजोगकडे निघाले असल्याची टीप आरोपींना दिली होती. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दोन दिवस सिद्धार्थ केजमध्येच होता. विशेष म्हणजे संतोष देशमुखांच्या अंत्यविधीलाही तो उपस्थित होता. त्यानंतर तो पसार झाला. कल्याणमध्ये उसाच्या ट्रॉलीवर काम करताना त्याला बेडय़ा ठोकण्यात आल्या.
कोण आहे डॉ.संभाजी वायबसे
केज तालुक्यातील कासारी येथील संभाजी वायबसे हा डॉक्टर असून त्याने काही दिवस बीडमध्ये प्रॅक्टिस केली. त्यानंतर तो केजमध्ये गेला आणि ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला. मुकादमकी करत असतानाच तो सावकारीही करत होता. याच माध्यमातून त्याची सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्याशी ओळख झाली. डॉ. वायबसेची पत्नी वकील आहे. केज न्यायालयात काही दिवस ती सरकारी वकीलही होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वायबसे दाम्पत्य बेपत्ता झाले होते. ते राज्याबाहेर असल्याची माहिती होती. मात्र नांदेडमध्ये त्यांचा ठावठिकाणा लागला.
चौदा दिवसांसाठी कोठडीत रवानगी
सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तिघांना आज केज न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी या प्रकरणात अजून बराच तपास शिल्लक आहे. मोबाईलमधील संभाषण तपासायचे आहे, त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. आरोपींच्या वकिलांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद नाकारला. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या. ए. व्ही. पावसकर यांनी तिघांनाही 18 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
धमकी देणे, खंडण्या गोळा करणे हाच यांचा धंदा
पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांनी सीआयडीची बाजू मांडताना या संपूर्ण प्रकरणाची अक्षरशः चिरफाड केली. धमकी देणे, खंडण्या गोळा करणे हाच या आरोपींचा धंदा आहे. सुदर्शन घुले याने अवादा कंपनीत जाऊन तेथील अधिकाऱयांना धमकावले होते. त्यानंतर तेथे राडा झाला. पुढे याच प्रकरणातून संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. आरोपींनी हा खून एन्जॉय केला, अतिशय अमानुषपणे केलेल्या हत्येचा कोणताही पश्चात्ताप या आरोपींना नाही असे गुजर म्हणाले. टोळीने गुन्हे करणारे हे आरोपी आहेत. नवीन येणाऱया उद्योगांना धमकावणे हा यांचा पेशाच आहे. त्यामुळे येथे उद्योगच येत नाहीत, असा खुलासाही गुजर यांनी केला.
असा मिळाला ठावठिकाणा
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर केजमधील डॉ. संभाजी वायबसे फरार असल्याची माहिती तपास यंत्रणांच्या समोर आली. अधिक चौकशीत हा डॉ. वायबसे फरार आरोपींच्या संपर्कात होता, त्यानेच आरोपींना फरार होण्यास मदत केली, आर्थिक मदतही केली, अशी माहिती मिळाल्यानंतर सीआयडीने त्याचा माग घेण्यास सुरुवात केली. डॉ. वायबसे आणि त्याची पत्नी नांदेडात लपून बसल्याचे कळताच त्यांना काल रात्री ताब्यात घेण्यात आले. चौदावे रत्न दाखवताच डॉ. वायबसे पोपटासारखा बोलू लागला. त्याने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेचा ठावठिकाणा सांगितला.
सर्व आरोपी पुण्यातच, त्यांना तिथे कोणी ठेवले? – धनंजय देशमुख
धनंजय देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना तपास यंत्रणांच्या तपासावर समाधान व्यक्त केले. सर्व आरोपींना ज्याने घटना घडायच्या अगोदर आणि घटनेनंतर मदत केली त्याचा तपास होऊन त्याला योग्य शिक्षा मिळायला हवी. ही संघटित गुन्हेगारी आहे. गुन्हेगारांना अभय मिळाले म्हणूनच त्यांचे धाडस वाढले, असेही ते म्हणाले. पुण्यात सगळे आरोपी सापडत आहेत, म्हणजे ते सर्व एका जागेवर आहेत. त्यांना तिथे कोणी आश्रय दिला हे तपासात समोर येईलच, अशी अपेक्षाही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.