बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना बेड्या ठोकल्या आहेत. दोघांनाही पुण्यातून अटक करण्यात आली असून पत्रकार परिषद घेऊन पोलीस याबाबत अधिक माहिती देणार आहे. या अटकेनंतर विधानसभेत आणि बाहेरही आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुदर्शन घुले हा केवळ प्यादा असून मुख्य आरोपी आका आहे, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात सहभागी असलेला एक आरोपी अद्याप फरार आहे. कृष्णा आंधळे असे या आरोपीचे नाव असून तो पोरगा आहे. सुदर्शन घुले हा देखील मुख्य आरोपी नाही. सुदर्शन घुले हा फक्त प्यादा असून मुख्य आरोपी आका आहे, असे सुरेश धस म्हणाले.
सुदर्शन घुले याला मुख्य आरोपी म्हणू नका. तो फक्त अंमलबजावणी करणारा प्यादा आहे. खंडणीसाठी साहेबांना उचलून आणा असा आदेश देणारा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. मुख्य आरोपी आका असून त्याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे, असेही धस म्हणाले.